ठाण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 21:59 IST2021-08-27T21:59:16+5:302021-08-27T21:59:59+5:30
ठाण्यातील प्रिती शिवकुमार जैयस्वाल (३५, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. आत्महतयेपूर्वी तिने आपल्यावर गुदरलेल्या अत्याचाराची माहिती देणारा व्हिडिओ रेकॉर्ड करुन मैत्रिणींना पाठविला.

आत्महत्येपूर्वी अत्याचाराची व्हिडिओद्वारे दिली मैत्रिणींना माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यातील प्रिती शिवकुमार जैयस्वाल (३५, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. आत्महतयेपूर्वी तिने आपल्यावर गुदरलेल्या अत्याचाराची माहिती देणारा व्हिडिओ रेकॉर्ड करुन मैत्रिणींना पाठविला. पतीने तिच्या आजाराकडेही कसे दुर्लक्ष केले, याचाही उल्लेख तिने यात केला आहे.
प्रितीच्या आजाराकडे दुर्लक्ष करतांना डॉक्टरांकडे न नेता तिचा पती मेलीस तरी चालेल, असे निर्दयीपणे म्हटल्याचेही तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये ती भावनाविवश होत आपल्यावरील अत्याचाराची कहानी कथन करीत असल्याचे समोर आल्यामुळे पोलीसही अवाक झाले. सासरचे आपल्याला खर्चासाठी एक छदामही देत नाहीत. त्यामुळे आपण पैसे जोडून शिलाई मशीन घेतली. तर तिचाही वापर करण्यास मज्जाव करण्यात आला. आपण उचलत असलेल्या या टोकाच्या पावलाबद्दल स्वत:च्या आई वडिलांची माफीही या संदेशात तिले मागितली आहे. घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी सकाळी धाव घेतली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारी पहाटेच तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात आली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चौकशी करण्यात येत असून दोषी असणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी सांगितले.