Thane: अंबरनाथमध्ये पतीने पत्नीची गळा चिरून केली हत्या
By पंकज पाटील | Updated: October 9, 2024 17:58 IST2024-10-09T17:57:22+5:302024-10-09T17:58:22+5:30
Thane News: अंबरनाथमध्ये पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. पालेगाव परिसरातील एका रहिवासी संकुलात मंगळवारी रात्री ही घटना घडली. पालेगाव परिसरातील पार्श्व हिल्स सोसायटीत विकी लोंढे हा पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह वास्तव्याला होता.

Thane: अंबरनाथमध्ये पतीने पत्नीची गळा चिरून केली हत्या
- पंकज पाटील
अंबरनाथ - अंबरनाथमध्ये पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. पालेगाव परिसरातील एका रहिवासी संकुलात मंगळवारी रात्री ही घटना घडली. पालेगाव परिसरातील पार्श्व हिल्स सोसायटीत विकी लोंढे हा पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह वास्तव्याला होता. या दोघांचा ३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला असून त्यांना एक वर्षाची मुलगी देखील आहे. या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून सतत वाद होत होते. याच वादातून मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास विकी याने त्याच्या पत्नीवर चाकूने वार करत गळा चिरून तिची हत्या केली आणि घरातून पसार झाला.
याबाबत रात्रीच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. या घटनेनंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आला आहे. तर आरोपी विकी लोंढे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. या घटनेमुळे या दाम्पत्याच्या एक वर्षाच्या चिमुकलीचे मायेचे छत्र मात्र हरपले आहे.