ठाण्यात मुलीने विषप्राशन तर आईने केली उडी मारून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 20:02 IST2017-11-28T19:52:01+5:302017-11-28T20:02:17+5:30
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. एकुलती एका मुलीने आत्महत्या केली. त्यानंतर,तिच्या विरहातूनआईने राहत्या घरातून १७ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले आहे.

ठाण्यात मुलीने विषप्राशन तर आईने केली उडी मारून आत्महत्या
ठाणे: ‘सीए’चे शिक्षण घेणा-या मुलीच्या आत्महत्येचे दु:ख सहन न झाल्याने, तिच्या आईनेही चोवीस तासात आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना ठाण्यात घडली. मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समोर आले नसून, सलग दोन दिवस माय-लेकींनी जिवनयात्रा संपविल्याने ठाण्यातील या कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले आहे.
पोखरण रोड येथील सिद्धांचल सोसायटीमध्ये १७ व्या मजल्यावर कोदमनचिली कुटूंब वास्तव्यास आहे. त्यांची १९ वर्षांची एकुलती एक मुलगी नौवया सीए शिकत होती. परिक्षा सुरु असताना, तिने शनिवारी अचानक उंदीर मारण्याच्या औषधासह काही अन्य गोळ्यांचे सेवन केले. त्यामुळे त्रास होऊ लागल्याने कुटुंबियांनी तिला ठाण्यातील एका नामंकीत रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराला तिने दाद दिली नाही. या घटनेने मुलीचे कुटुंब शोकसागरात बुडाले. तिची आई शुगुनाच्या दु:खाला तर पारावर राहिला नाही. जिवापाड जपलेल्या मुलीचा मृतदेह घरी नेल्यानंतर, त्या एकटक तिच्याकडे पाहत होत्या. रविवारी सकाळी सहा ते सव्वा सहा वाजताच्या सुमारास शुगुना घराबाहेर आल्या. दु:खाच्या भरात त्यांनी इमारतीच्या १७ व्या मजल्यावरील जिन्याच्या खिडकीतून उडी घेतली.त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मुलीच्या विरहातून त्यांनी आत्महत्या केली असावी,अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. चितळसर पोलीस ठाण्यात दोन्ही घटनांची वेगवेगळी नोंद करण्यात आली आहे. नौवया ही अभ्यासात हुशार होती. तिच्या हाती नेहमीच पुस्तक असायचे.तिच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आले नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस अधिकारी रुपाली पाटील करीत आहेत.
..............................