Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 08:10 IST2025-09-07T08:09:36+5:302025-09-07T08:10:46+5:30
Ganesh Visarjan Thane: ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये गणेश विसर्जनावेळी दुःखद घटना घडली. विसर्जन सुरू असताना पाच तरुण बुडाले. दोघांना वाचवण्यात यश आले, पण...

Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
Ganapati Visarjan Latest News: गणपतीचे विसर्जन सुरू असताना एका तरुणाने नदी उडी घेतली. तो बुडायला लागला म्हणून आणखी चार जणांनी उड्या मारल्या. पण, ते पाचही जण बुडायला लागले म्हणून इतरजण मदतीला धावून गेले. पण, दोघांना बाहेर काढण्यात यश आले. इतर तिघे बुडाले. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून, उर्वरित दोघांचा शोध सुरूच आहे. शहापूर तालुक्यातील आसनगावमध्ये ही घटना घडली आहे.
आसनगाव येथील मुंडेवाडीमध्ये शिवतेज मित्र मंडळाच्या गणपतीच्या विसर्जनाची शनिवारी सायंकाळी तयारी सुरू होती. साडेसहा वाजता ही घटना घडली. गणेश मंडळातील प्रतीक मुंडे यांचा बुडून मृत्यू झाला.
दत्ता लोटे नदीत उतरला अन्...
भांरगी नदीच्या काठावर गणपती विसर्जनाआधी आरती सुरू होती. त्यावेळी दत्ता लोटे हा पोहण्यासाठी भारंगी नदीत उतरला. पण, पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकला अन् तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी प्रतीक मुंडे, रामनाथ घारे, भगवान वाघ आणि कुलदीप जाखेरे यांनी उड्या मारल्या.
पण, पाचही जण बुडू लागले. त्यावेळी योगेश्वर नाडेकरने इतरांच्या मदतीने पाण्यात उतरून रामनाथ आणि भगवान या दोघांना पाण्याबाहेर काढले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने शहापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रतीक मुंडेचा मृतदेह सापडला
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जीवरक्षक टीम आणि गणेश मंडळातील इतरांनी इतर तिघांचा शोध घेतला. त्यावेळी प्रतीक मुंडे हा तरुण सापडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. दरम्यान, कुलदीप आणि दत्तू या दोघांचा शोध सुरूच आहे.