ठाण्यातील घरगुती नळांनाही बसणार मे महिनाअखेरपर्यंत मीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 03:56 IST2019-04-02T03:56:04+5:302019-04-02T03:56:21+5:30
स्मार्ट मीटरचा प्रयोग : पाणी गळती आणि चोरीला आळा घालण्याचा प्रयत्न

ठाण्यातील घरगुती नळांनाही बसणार मे महिनाअखेरपर्यंत मीटर
ठाणे : आधी हायटेक, नंतर स्मार्ट आणि त्यानंतर पुन्हा सेमीआॅटोमेटीक मीटर अशा पद्धतीने मागील १२ वर्षे पालिकेने नळसंयोजनांवर मीटर बसवण्यासाठी विविध पद्धतीने निविदा काढल्या होत्या. परंतु, अखेर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आता स्मार्ट मीटर बसवले जाणार असून पालिकेने काढलेल्या निविदेला प्रतिसाददेखील मिळाला आहे. त्यानुसार, आता बल्कस्वरूपात व्यावसायिक वापराच्या नळसंयोजनांवर मीटर बसवण्याचा प्रयोग पालिकेमार्फत सुरू झाला आहे. त्यानुसार, मे अखेरपर्यंत घरगुती वापराच्या नळसंयोजनांवरदेखील मीटर बसवण्यास सुरुवात होईल, असा दावा पालिकेने केला आहे.
पाणीगळती आणि पाणीचोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसुली व्हावी, या उद्देशाने प्रथम हायटेक स्वरूपाचे, परदेशी तंत्रज्ञानाचे मीटर बसवण्याचे पालिकेने निश्चित केले होते. यासाठी ३५ कोटींचा निधी खर्च केला जाणार होता. परंतु, तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव या योजनेविषयी साशंक होते. मधल्या काळात तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी ही योजनाच गुंडाळली होती. दरम्यान, पुन्हा एआरएमचे सेमीआॅटोमेटीक मीटर बसवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. त्यानुसार, या कामाच्या निविदा मागील वर्षी मागवण्यात आल्या होत्या. हे रोल मॉडेल पीपीपी तत्त्वावर राबवण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला होता. या योजनेच्या निविदेला वारंवार मुदतवाढ देऊनही, प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर, या कामासाठी स्मार्ट सिटीतून खर्च करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आणि या कामासाठी १०४.५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. दुसरीकडे स्मार्ट सिटीच्या बैठकीत या मीटरचा बोजा ठाणेकरांवर पडू नये, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, स्मार्ट मीटरचा मार्ग मोकळा झाला आणि ठाणे महापालिका स्मार्ट सिटीतून ७० टक्के आणि ३० टक्के खर्च स्वत: उचलणार आहे.
पहिल्या टप्प्यात १३ हजार स्मार्ट मीटर
आता एक लाख १३ हजार स्मार्ट मीटर पहिल्या टप्प्यात बसवले जाणार असून यामध्ये इमारतींचा समावेश असणार आहे. त्यानुसार, आता या प्रक्रियेला सुरुवात झाली असून प्रायोगिक तत्त्वावर व्यावसायिक वापराच्या नळसंयोजनांवर २० ठिकाणी अशा स्वरूपाचे मीटर बसवण्यात आले असल्याची माहिती पालिकेने दिली. हा प्रयोग यशस्वी झाल्यास टप्प्याटप्प्याने इतर सर्व व्यावसायिक नळसंयोजनांवर अशा स्वरूपाचे मीटर बसवले जाणार आहेत. त्यानंतर, इमारतींना मीटर बसवले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. त्यानुसार, घरगुती वापराच्या नळसंयोजनांवर तीन महिन्यांत हे मीटर टप्प्याटप्प्याने बसवले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.