"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 21:00 IST2025-09-26T20:59:41+5:302025-09-26T21:00:01+5:30
ठाण्याच्या जिल्हा नियोजन बैठकीत एकनाथ शिंदे यांनी रस्त्याच्या कामावरुन अधिकाऱ्यांना इशारा दिला.

"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
Eknath Shinde in DPDC Meeting: ठाण्यातल्या रस्त्याच्या कामावरुन आणि वाहतूक कोंडीवरुन नागरिक गेल्या काही दिवसांपासून चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरुन ठाणे जिल्हा नियोजन बैठकीत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. वाहतूक कोंडीमुळे स्थानिक आमदार चांगलेच आक्रमक झाले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. आठ महिन्यांनी झालेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं होतं. ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक समिती गठीत करा अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा सर्वाधिक गाजला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार नरेश म्हस्के, बाळ्या मामा म्हात्रे, किसन कथोरे, संजय केळकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडीवरुन आणि रस्त्यांच्या कामावरुन अधिकाऱ्यांनी झापलं. तसेच एका अधिकाऱ्याच्या निलंबनाचेही आदेश एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
यावेळी एकनाथ शिंदे अधिक्षक अभियंत्यांना रस्त्याच्या कामावरुन कारवाईचा इशारा दिला. "तुम्ही कामाच्या ठिकाणी कधी गेला आहात का, तिथे जाऊन काय करता. काम होत असताना ते चांगल्या दर्जाचे होत आहे की नाही हे पाहणे तुमची जबाबदारी आहे. एवढा समृद्धी मार्ग झाला पण वडपा ते कापूर बावडी मार्ग का होत नाही. काम करत असताना तुमचं तिथे लक्ष हवं. काम खराब झाल्याबद्दल सांगायला हवं. तो डोंगरे कोण आहे त्याला पूर्णपणे मी आज मी निलंबित करतो. तुम्ही जर काम करून नाही घेतलं तर तुमच्यावरही कारवाई होईल," असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
"परवा मंत्री छगन भुजबळ यांनी हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. मला त्यांनी स्पष्टपणे सांगितले की शिंदे साहेब तुम्ही यातून मार्ग काढा. वेळेवरच सगळ्या गोष्टी करून घेण्याचं काम आपल्या विभागाचं आहे. एमएसआरडीसी डिपार्टमेंट आपल्याकडेच आहे. तुम्ही असे नाव खराब करायला लागले तर कसं काय करणार. लोकांना काय सांगणार," असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
"ठाणे शहराकरीता स्वतंत्र धरणाचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहण करीता पैसेही दिलेत, मग काम का थांबले? अशी विचारणा करून फटाफट कामे मार्गी लावा. तसेच काळू धरणाकरीता आपण किती वर्षे प्रयत्न करतोय. त्याचे काम संथ गतीने का सुरू आहे. टाईमबॅान्ड घेऊन काम पूर्ण करा," असे एकनाथ शिंदे म्हणाले.