ठाणे जिल्हा परिषद गाड्यांच्या खरेदीपूर्वी विरोधक सध्याच्या गाड्यांचे लॉगबूक तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 20:29 IST2018-02-22T20:17:32+5:302018-02-22T20:29:03+5:30
सध्या असलेल्या गाड्या नव्या असल्यामुळे नवीन खरेदी करण्याची गरज नसल्याच्या मुद्यांवर सभागृहात सत्ताधा-याना दीर्घवेळ धारेवर धरले. ठिकठिकाणी धावलेल्या या गाड्यांचे दैनंदिन लॉगबुक तपासणी करण्याच्या अटीवर विरोधकांनी या ठरावास अखेर मंजुरी

ठाणे जिल्हा परिषद गाड्यांच्या खरेदीपूर्वी विरोधक सध्याच्या गाड्यांचे लॉगबूक तपासणार
ठाणे : पदाधिका-यांसाठी नव्या गाड्या खरेदी करण्याचा ठराव ठाणे जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मांडला असता त्यास भारतीय जनता पार्टी या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विरोध केला. सध्या असलेल्या गाड्या नव्या असल्यामुळे नवीन खरेदी करण्याची गरज नसल्याच्या मुद्यांवर सभागृहात सत्ताधा-याना दीर्घवेळ धारेवर धरले. ठिकठिकाणी धावलेल्या या गाड्यांचे दैनंदिन लॉगबुक तपासणी करण्याच्या अटीवर विरोधकांनी या ठरावास अखेर मंजुरी दिल्याचे अध्यक्षा मंजुषा जाधव यांनी लोकमतला सांगितले.
‘पदाधिका-यांसह सभापतींचा नव्याको-या गाड्यांसाठी हट्ट’ या मथळ्याखाली लोकमतने १९ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध करून नवीन गाड्या खरेदीचा विषय उघड केला होता. या वृत्ताची दखल घेऊन भाजपाच्या सदस्यांनी सभागृहात हा ठराव आला असता त्यास विरोध करून त्यावर दीर्घवेळ चर्चा केली. तत्पूर्वी पंचायत समिती सभापतींच्या गाड्या खरेदीच्या ठरावास विरोधी पक्षाने सहमती दर्शविली. पण जिल्हा परिषद पदाधिका-यांच्या गाड्यांना त्यांनी विरोध दर्शविला. त्यांचा हा विरोध दूर करण्यासाठी महिला बालकल्याण समिती सभापतींची गाडी आडरानात बंद पडल्याची घटना सभागृहात उघड केल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्या तीन महिला पदाधिकारी आहेत. सध्याच्या गाड्या जुन्या असल्यामुळे दौ-याच्या वेळी त्या बंद पडण्याची भीती आहे. यामुळे नवीन गाड्यांची खरेदी करणे गरजेचे असल्याच्या मुद्यांवर विरोधीकांचा विरोध मावळला. अखेर सध्याच्या गाड्या निर्लेखीत करण्याच्या लायक आहे की नाही, यासाठी त्या किती किलो मीटर धावल्या, कोठे कोठे धावल्या आदींची नोंद असलेले लॉगबुक तपासण्याची अट घालून विरोधकांनी गाड्या खरेदीच्या प्रस्तावास सहमती दर्शवल्याचे जाधव यांनी सांगितले.