'ठाणे कॅप्टनसोबतच खेळाडूही चांगले; आयुक्त-लोकप्रतिनिधींमधील खोडा काढला'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 23:12 IST2019-09-11T23:11:42+5:302019-09-11T23:12:34+5:30
जिल्हा रुग्णालयाच्या ८३ वर्षे जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून तिथे उभारण्यात येणाºया अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या संकल्पचित्राचे अनावरण बुधवारी ठाकरे यांच्या हस्ते झाले.

'ठाणे कॅप्टनसोबतच खेळाडूही चांगले; आयुक्त-लोकप्रतिनिधींमधील खोडा काढला'
ठाणे : आता गैरसमज दूर झाले आहेत. चांगले काम करणाऱ्या टीममध्ये खोडा घालण्याचा प्रकार काही जण करत असतात. तो खोडा आम्ही काढून टाकला आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना उद्देशून केले. ठाणे महापालिकेत शिवसेनेसह अन्य पक्षांचे नगरसेवक व आयुक्त जयस्वाल यांच्यात दोन आठवडे रंगलेला वाद मंगळवारी मातोश्रीवर शमला. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे म्हणाले की, टीम वर्क महत्त्वाचे आहे. टीममध्ये चांगला कॅप्टन आणि खेळाडू नसतील, तर त्या दोघांचा काही उपयोग नाही. मात्र, ठाण्यात हे समीकरण चांगले जुळून आल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा रुग्णालयाच्या ८३ वर्षे जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून तिथे उभारण्यात येणाºया अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या संकल्पचित्राचे अनावरण बुधवारी ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ठाकरे म्हणाले की, दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञान येत आहे. नवीन उपकरणे विजेवर चालतात. पण, ती हाताळणारी माणसे ही फार महत्त्वाची असतात, असे सांगत त्यांनी परिचारिकांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांना व्यासपीठावर बोलवले. मात्र, आपण ते ‘लगे रहो मुन्नाभाई’सारखे केलेले नाही, असे मिश्कीलपणे ते म्हणाले.
जिल्हा रुग्णालयासाठी आठ दशकांपूर्वी आपली जमीन देणारे विठ्ठल सायन्ना यांचाही त्यांनी भाषणात गौरव केला. जमिनी हडप करण्याकडे लोकांचा कल असतो. पण, आपली जमीन सार्वजनिक हितासाठी दान करणारी माणसे विरळ होत चालली आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मुलुंड आणि ठाणेदरम्यान रेल्वेस्टेशन करण्याचे महत्त्वाचे काम आपण करणार आहोत. अनेक वर्षांपासून ही ठाणेकरांची मागणी आहे. वाढत्या लोकसंख्येला एकेक मार्ग देत असताना स्टेशनचीही गरज आहे असे ते म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार
आरोग्य क्षेत्रात उत्तम सेवा बजावणाºया व्यक्ती आणि संस्थांना बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याची घोषणा याप्रसंगी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तज्ज्ञांची निवड समिती विजेत्यांची निवड करणार असून आरोग्य क्षेत्रात, विशेषत: सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी हे पुरस्कार देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.