रिक्षा चालकांना मारहाण झाली नाही; व्यापारी स्वच्छेने बंदमध्ये सहभागी; एकनाथ शिंदेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 17:16 IST2021-10-11T17:05:18+5:302021-10-11T17:16:45+5:30
ठाण्यात सोमवारी महाविकास आघाडीकडून बंद पुकारण्यात आला होता.

रिक्षा चालकांना मारहाण झाली नाही; व्यापारी स्वच्छेने बंदमध्ये सहभागी; एकनाथ शिंदेंचा दावा
ठाणे: लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे ठाण्यात सर्वसामान्य ठाणोकरांचे चांगलेच हाल झाल्याचे दिसून आले. त्यात शिवसैनिकांकडून दुकानदारांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्याचे आवाहन केले जात होते. तसेच रिक्षा चालकांना देखील मारहाण करण्यात आली. परंतु ठाण्यातील व्यापारी हे स्वच्छेने बंदमध्ये सहभागी झाले असल्याचं सांगत कोणत्याही रिक्षा चालकांना मारहाण झाली नसल्याचा दावा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तरीदेखील मारहाण प्रकरणी माहिती घेऊन पोलिस आयुक्त यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती देखील एकनाश शिंदे यांनी यावेळी दिली.
ठाण्यात सोमवारी महाविकास आघाडीकडून बंद पुकारण्यात आला होता. परंतु यावेळी स्टेशन परिसर, जांभळी नाका, नौपाडा भागातील व्यापा:यांची दुकाने बंद करण्याचे काम आंदोलनकत्र्या शिवसैनिकांकडून केले जात असल्याचे चित्र दिसून आले. तसेच रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षा चालकांना देखील मारहाण करीत रिक्षा बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून आले. या बाबत एकनाथ शिंदे यांना छेडले असता, त्यांनी लखीमुपर झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्युनंतर हा बंद पुकारण्यात आला आहे. त्याला व्यापाऱ्यांनी आणि नागरीकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. ते स्वच्छेने या आंदोलनात सहभागी झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
चंद्रकात पाटील यांनी हे आंदोलन फसल्याची टिका केली आहे, यावर त्यांना छेडले असता, हे आंदोलन कुठल्याही प्रकारे आंदोलन फसलेले नाही, उलट अत्यावश्यक सेवा वगळून सर्वच आस्थापना बंद असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ठाण्यात काही ठिकाणी जबरदस्तीने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्याबाबत शिंदे यांनी मात्र कोणावरही जबरदस्तीने बंद करण्याची वेळ आलेली नाही, ते स्वत:हून बंदमध्ये सहभागी झाल्याचा दावा केला आहे. टिएमटी बंद ठेवण्यामागे कारण काय असा सवाल केला असता, नागरीकांनी ठरवले होते, की कामकाज बंद ठेवण्याचे त्यानुसार कोणाचही गैरसोय झालेली नाही. तशी आगाऊ सुचना देखील दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.