Thane: मशीनगनसह २० पिस्तुल, २८० जिवंत काडतुसे जप्त, ठाणे गुन्हे शाखा युनिट ५ ची कारवाई

By अजित मांडके | Updated: July 12, 2023 14:56 IST2023-07-12T14:55:48+5:302023-07-12T14:56:54+5:30

Thane Crime News: हत्यार विक्री गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीस ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिटच्या पथकाने मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवरील पळासनेर या गावातून अटक केली.

Thane: 20 pistols with machine guns, 280 live cartridges seized, Thane Crime Branch Unit 5 action | Thane: मशीनगनसह २० पिस्तुल, २८० जिवंत काडतुसे जप्त, ठाणे गुन्हे शाखा युनिट ५ ची कारवाई

Thane: मशीनगनसह २० पिस्तुल, २८० जिवंत काडतुसे जप्त, ठाणे गुन्हे शाखा युनिट ५ ची कारवाई

- अजित मांडके
ठाणे - हत्यार विक्री गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीस ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिटच्या पथकाने मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवरील पळासनेर या गावातून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुजितसिंग उर्फ माजा आवसिंग असे असून त्याच्या ताब्यातून एक मशीनगन, देशी बनावटीचे २० पिस्तुल, २ मॅगझीन आणि २८० जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला.

ठाण्यातील वागळे स्टेट पोलीस ठाण्यात आरोपी सुजितसिंग उर्फ माजा आवसिंग (२७, राहणार-उमरटी गाव, ता. वरला, जिल्हा बडवाणी, मध्य प्रदेश) याच्या विरोधात हत्यार प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल असून तो फरार होता. दरम्यान, हा फरार आरोपी महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील व धुळे जिल्ह्यातील पळासनेर या गावात पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटच्या पथकास मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेचे एक पथक महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील धुळे जिल्ह्यात असलेल्या पळासनेर या गावात पोहचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने 11 जुलै रोजी आरोपीस सापळा लावून अटक केली. यावेळी आरोपीच्या ताब्यात एक देशी बनावटीची मशीनगन, 20 देशी बनावटीचे पिस्तुल, दोन मॅगझीन, 280 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा मिळून आला. हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून आरोपीकडे अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा, वागळे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली.

Web Title: Thane: 20 pistols with machine guns, 280 live cartridges seized, Thane Crime Branch Unit 5 action