ठाण्यात मतदारांसाठी २०,३८६ शाईच्या बाटल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 23:41 IST2019-10-19T23:41:05+5:302019-10-19T23:41:35+5:30
जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांचा प्रचार शनिवारी सायंकाळी संपणार आहे. या मतदारसंघातील २१३ उमेदवारांच्या मतदानासाठी जिल्हाभर तब्बल सहा हजार ६२१ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत.

ठाण्यात मतदारांसाठी २०,३८६ शाईच्या बाटल्या
- सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांचा प्रचार शनिवारी सायंकाळी संपणार आहे. या मतदारसंघातील २१३ उमेदवारांच्या मतदानासाठी जिल्हाभर तब्बल सहा हजार ६२१ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. त्यावर २१ आॅक्टोबर रोजी ६३ लाख २९ हजार मतदार मतदान करणार आहेत. या वेळी त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला लावण्यासाठी तब्ब्ल २० हजार ३८६ शाईच्या बॉटल उपलब्ध झाल्या आहेत.
प्रत्येक मतदानकेंद्रावर सुमारे एक हजार ५०० मतदारांच्या मतदानाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सुमारे सहा हजार ६२१ मतदान केंद्रे तैनात करण्यात आली आहेत. या प्रत्येक केंद्रावर मतदान करणाऱ्यांच्या बोटाला शाई लावण्यात येणार आहे. त्यासाठी शाईच्या दोन बॉटल पुरवण्याचे नियोजन निवडणूक आयोगाने केले आहे. यासाठी कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथून ती आणण्यात आली आहे. या शाईचा वापर मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटाला लावण्यासाठी होणार आहे.
तंत्रज्ञान युगात ईव्हीएम मशीनद्वारे मतदान होत असतानाही बॅलेटपेपरच्या युगातील म्हैसूर शाई लावून आजही मतदान केल्याचे खात्रीलायक दिसून येत आहे. मात्र, या मतदानयंत्राला बायोमेट्रिक पद्धतीने थम्बचा वापर केल्यास या शाईची गरज भासणार नाही. याशिवाय, बनावट मतदानासही आळा बसेल, असे जाणकारांमध्ये ऐकायला मिळत आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी ६३ लाख २९ हजार मतदारांना मतदानाचा हक्क दिला आहे. यातून ७० टक्के मतदान होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.