ठाणे : मालमत्तेच्या वादातून आपल्या मोठ्या भावाची पत्नी सुभद्रा यादव (४७) हिच्यावर चाकूने वार करणा-या मंगल उर्फ रामअकबाल यादव (३८) याला चितळसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.सुभद्रा आणि तिचा धाकटा दीर मंगल यांच्यात गांधीनगर येथे असलेल्या वडिलोपार्जित मालमत्तेवरून १९ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास धर्मवीरनगर येथील घरात वाद झाला. मंगल याच्याकडून मालमत्तेबाबत विचारणा होत असतांना सुभद्रा त्यांना टाळत होती. यातूनच त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. याच झटापटीमध्ये मंगलने तिच्या पोटावर डाव्या बाजूने चाकूने वार केले. यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गांधीनगर भागात या दोन्हीही भावांच्या दोन स्वतंत्र खोल्या आहेत. याशिवाय, त्याच भागात गिरणी आणि दुकानही आहे. गिरणी आणि दुकानही मोठ्या भावाच्याच ताब्यात असल्यामुळे समान वाटप केले जावे, अशी मंगलची मागणी आहे. याच मागणीवरून तो आणि त्याचा मोठा भाऊ राजभली यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. यातूनच १९ फेब्रुवारी रोजीही या दीर भावजयीमध्ये पुन्हा याच कारणावरुन वाद झाल्याने त्याने तिच्यावर वार केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी सांगितले. या हल्ल्या प्रकरणी तिने दीराविरुद्ध २० फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल केली आहे. त्याला मंगळवारी सायंकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अद्याप अटक केली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक आर. सी. घनवट या अधिक तपास करीत आहेत.
ठाण्यात मालमत्तेच्या वादातून भावजयीवर चाकूने हल्ला: दीराला घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 22:57 IST
वडीलोपार्जित मालमत्तेमध्ये आपल्याला हिस्सा मिळावा यासाठी वाद घालून दिराने मोठया भावजयीवर वार केल्याची घटना ठाण्याच्या धर्मवीरनगरामध्ये सोमवारी घडली.
ठाण्यात मालमत्तेच्या वादातून भावजयीवर चाकूने हल्ला: दीराला घेतले ताब्यात
ठळक मुद्देवाद घालून केला चाकूने हल्लाभावजयीवर रुग्णालयात उपचार सुरुचितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा