पालघर: पालघर विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयाशेजारी असलेल्या एका बंद रेल्वे फाटकाच्या ठिकाणी रेल्वे क्रॉस करीत असलेल्या ४ लोकांना भरधाव ट्रेनने उडवले. या अपघातात तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पालघर - मनोर रस्त्यावरील बंद पडलेल्या रेल्वे फाटकाजवळ रेल्वे क्रॉस करत असताना एका भरधाव ट्रेनने चार लोकांना जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर सध्या पालघरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस (आरपीएफ) आणि पालघर रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. पालघर शहरालगत अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक अवैधरित्या ओलांडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्याचे रेल्वे प्रशासनाने नमूद केले आहे.