विशाल हळदे -ठाणे : गायमुख घाट उतरणीवर शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. टाटा कंपनीचा सिमेंट वाहून नेणारा कंटेनर ठाण्याकडे येत असताना नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेने बोरिवलीकडे जाणाऱ्या तब्बल ११ वाहनांना धडक देत अपघात झाला. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाला ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.४५ वाजता या घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास गायमुख जकात नाक्याजवळ, घोडबंदर रोडवरील गायमुख घाट उतरणीवर टाटा कंपनीचा कंटेनर (MH 04 KF 0793) ठाण्याच्या दिशेने येत होता. सुमारे ३५ ते ४० टन सिमेंटच्या गोण्या वाहून नेणाऱ्या या कंटेनरने उतरणीवर नियंत्रण गमावल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर कंटेनरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला.
या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये रिक्षाचालक शिवकुमार यादव (वय ५६) यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, रिक्षामधील प्रवासी तस्किन शेख (वय ४५) व अनिता पेरवाल (वय ४५) यांना चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच कारचालक रामबली बाबूलाल (वय २२) यांना कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. सर्व जखमींना ओवळा येथील टायटन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर काही वाहनांतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
अपघातात होंडा सिटी, व्हॅगनार, इर्टिगा, महिंद्रा XEV 9E, इनोवा, डिझायर, ब्रेझा, फोर्ड कार तसेच ऑटो रिक्षा अशा एकूण ११ वाहनांचे नुकसान झाले आहे. काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक गाड्यांच्या पुढील व मागील भागाची चांगलीच चुराडा झाली आहे.
अपघातग्रस्त वाहनांमधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑईल सांडल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. घटनास्थळी कासारवडवली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले. अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावर सांडलेल्या ऑईलवर माती पसरवून पुढील अपघाताचा धोका टाळण्यात आला.
या अपघातामुळे ठाणे–घोडबंदर रोडवरील दोन्ही वाहिन्यांवर सुमारे दोन तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांचे हाल झाले. अखेर अपघातग्रस्त सर्व वाहने रस्त्याच्या कडेला हटवण्यात आली असून सध्या घोडबंदर रोडवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.
दरम्यान, कंटेनर चालकाचा शोध घेण्याचे काम कासारवडवली पोलीस करीत असून अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे.
Web Summary : A container truck lost control on Ghodbunder Road, colliding with eleven vehicles and injuring four. The accident caused a massive traffic jam. Injured were hospitalized, and traffic has returned to normal.
Web Summary : घोडबंदर रोड पर एक कंटेनर ट्रक अनियंत्रित हो गया, जिससे वह ग्यारह वाहनों से टकरा गया और चार लोग घायल हो गए। दुर्घटना के कारण भारी जाम लग गया। घायलों को अस्पताल में भर्ती कराया गया और यातायात सामान्य हो गया है।