Tempo driver killed in truck collision; The other two were seriously injured | ट्रकच्या धडकेत टेम्पो चालकाचा मृत्यु; अन्य दोघे गंभीर जखमी

रस्त्यावरील तिघांना धडक

ठळक मुद्दे रस्त्यावरील तिघांना धडक ट्रक चालकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने भाजीच्या दोन टेम्पोंना धडक दिल्यामुळे या दोन टेम्पोंच्या मध्यभागी उभ्या असलेल्या तिघांपैकी भूषण सुनिल माळी (२५) या क्लिनरचा मृत्यु झाला. तर संदीप पाटील (२३, चालक) आणि जगदीश माळी (२७, क्लिनर) हे अन्य दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास कळवा येथे घडली. याप्रकरणी ट्रक चालक विकास गौड (२५, रा. उत्तरप्रदेश) याला कळवा पोलिसांनी अटक केली आहे.
पवन या टेम्पो चालकासह वरील तिघे असे चौघेही अमळनेर (जळगाव) येथील रहिवाशी आहेत. ते अमळनेर येथून ११ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दोन टेम्पोंमधून भाजीपाला घेऊन नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटकडे निघाले होते. सोमवारी पहाटे (१२ एप्रिल रोजी) ३ वाजण्याच्या सुमारास खारेगाव टोलनाक्यापासून काही अंतरावर असलेल्या पारसिकनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर गॅमन चौक येथे लघुशंकेसाठी थांबले होते. एका पाठोपाठ उभ्या असलेल्या दोन टेम्पोंच्या मध्ये हे चौघेही चालक आणि क्लिनर उभे होते. त्यादरम्यान मुंब्य्राच्या दिशेने भरघाव वेगाने निघालेल्या अन्य एका ट्रकने भाजीपाला भरललेल्या मागच्या टेम्पोला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, लघुशंका करुन पुन्हा टेम्पोमध्ये बसण्यासाठी जात असलेल्या भूषण माळी, संदीप पाटील आणि जगदीश माळी यांच्या अंगावर टेम्पो पलटी होऊन तिघेही टेम्पोखाली दाबले गेले. या अपघाताची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक शिरीष यादव, वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार पाटील आणि पोलीस नाईक गटकांबळे आणि राठोड आदींनी क्रेनच्या मदतीने टेम्पो सरळ करून तिघांनाही बाहेर काढले. त्यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, तिघांपैकी भूषणचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर चालक संदीप आणि क्लिनर जगदीश यांना पुढील उपचारासाठी सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चौघांपैकी पवन हा किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून विकास गौड या ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Tempo driver killed in truck collision; The other two were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.