मोफत सॅनिटरी नॅपकिनच्या मागणीसाठी ठाण्यात तहसीलदारांना साकडे!
By सुरेश लोखंडे | Updated: March 16, 2026 19:03 IST2026-03-16T19:03:11+5:302026-03-16T19:03:24+5:30
Thane News: गरीब, आदिवासी व कातकरी समाजातील महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लक्ष वेधत श्रमजीवी संघटनेच्या महिलांच्या शिष्टमंडळाने सोमवारी ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

मोफत सॅनिटरी नॅपकिनच्या मागणीसाठी ठाण्यात तहसीलदारांना साकडे!
- सुरेश लोखंडे
ठाणे - गरीब, आदिवासी व कातकरी समाजातील महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लक्ष वेधत श्रमजीवी संघटनेच्या महिलांच्या शिष्टमंडळाने सोमवारी ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. रेशन दुकानांमार्फत दरमहा मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याची योजना तातडीने सुरू करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली, असे श्रमजीवी संघटनेच्या जेष्ठ कार्यकर्त्या नंदा वाघे यांनी लाेकमतला सांगितले.
श्रमजीवी संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदाेलन केले. त्यानंतर या महिलांनी तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांना पिवेदन दिले. या निवेदनात ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी व कातकरी महिला मजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. या मासिक पाळीच्या काळात त्यांना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करणे शक्य नाही. अनेक महिलांना अस्वच्छ कापड किंवा इतर अपुऱ्या साधनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे संसर्गजन्य आजार, त्वचारोग तसेच गर्भाशयाशी संबंधित आजारांचा धोका वाढत असल्याची चिंता संघटनेने व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर रेशन दुकानदारांमार्फत जसे धान्य दिले जाते, त्याच धर्तीवर गरीब, आदिवासी व कातकरी महिलांना दरमहा किमान १२ सॅनिटरी नॅपकिन मोफत उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करावी. तसेच ग्रामीण व आदिवासी भागात मासिक पाळीबाबत स्वच्छता व आरोग्याविषयी जनजागृती मोहीम राबविण्याचीही मागणी करण्यात आली आहे. यासाठी शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून तातडीने शासन निर्णय काढावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात ठाणे तहसीलदार ऊमेश पाटील यांना निवेदन देतांना जया पारधी, लक्ष्मी वाघ, नंदा वाघे, दर्शना आगिवले, मनिषा खोडका आदींचा समावेश होता.