Tauktae Cyclone: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकेपर्यंत ठाणे जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा; खलाश्यांचे जहाज भरकटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 17:58 IST2021-05-17T17:58:07+5:302021-05-17T17:58:28+5:30
तौत्के चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसल्याने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत नाही तोपर्यंत या जिल्ह्यांना त्याचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

Tauktae Cyclone: तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकेपर्यंत ठाणे जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा; खलाश्यांचे जहाज भरकटले
ठाणे : तौत्के चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसल्याने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत नाही तोपर्यंत या जिल्ह्यांना त्याचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मीरा-भाईंदरच्या उत्तन समुद किनाऱ्यापासून १० नॉटिकल मैलांवर जहाज भरकटले आहे. सहा खलाशी असलेले हे जहाज मात्र सध्या तटरक्षक दलाच्या संपर्कात असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
या तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी सोमवारी ठाणे जिल्ह्याधिकारी कार्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी बोलताना शिंदे यांनी या भरकटलेल्या जहाजा विषयी माहिती देऊन वादळाचा जोर ओसरल्यावर ते उत्तनच्या किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी एमएमआर क्षेत्रातील प्रत्येक महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला फोन करून तेथील परिस्थितीबाब विचारणा केली. सोमवारी सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी झाडे पडली असून घरांवरील पत्रे उडाली आहेत. काही ठिकाणी विजेचे खांब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
नवी मुंबईत दुचाकीवर झाड कोसळल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला; तर उल्हासनगरमध्ये एका रिक्षेवर झाड कोसळल्याने दोन प्रवासी गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती शिंदे यांनी घेऊन जखमींना वेळेत चांगले उपचार मिळतील, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील एकूण परिस्थिती तूर्तास नियंत्रणात असली तरी ठाणे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर या परिस्थितीचा आपत्ती नियंत्रण कक्षातून सातत्याने आढावा घेत असल्याचे सुतोवाच शिंदे यांनी केले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आपत्कालीन पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश दिल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.