तानसा, मोडक सागर धरण भरण्याच्या तयारीत; धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा
By सुरेश लोखंडे | Updated: July 12, 2022 18:06 IST2022-07-12T18:06:31+5:302022-07-12T18:06:35+5:30
जिल्ह्याच्या हद्दीत बृहन्मुंबई महानगरपालिकेची तानसा व मोडक सागरही धरणे आहेत.

तानसा, मोडक सागर धरण भरण्याच्या तयारीत; धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा
ठाणे : जिल्ह्यातील तानसा व मोडक सागर धरणाच्या परिसरात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे ही दोन्ही धरणे लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरणांच्या खालील तानसा व वैतरणा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
जिल्ह्याच्या हद्दीत बृहन्मुंबई महानगरपालिकेची तानसा व मोडक सागरही धरणे आहेत. सध्याच्या जोरदार पावसामुळे या धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढला आहे. तानसाच्या पाणी पातळीची क्षमता १२८.६३ मीटर असून सध्या या धरणाची पातळी १२५.३३ मीटर तयार झाली आहे. याप्रमाणेच मोडक सागर धरणाची १६३.१४ मीटर पाणी पातळीची क्षमता आहे. त्यास अनुसरून या धरणाची पातळी १६१.३३ मीटर झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही धरणं कोणत्याही क्षणी ओसंडून वाहण्याच्या तयारीत आहे.
तत्पूर्वी या धरणाखालील नदीच्या काठावरील गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहापूर, भिवंडी, वाडा, वसई व पालघर या तालुक्यातील गावांच्या ग्रामस्थांनी सावध रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या परिसरातील शासकीय यंत्रणांनाही सतर्क करण्यात आले आहे.