१६० गुन्हेगारांवर तडीपारीची तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:03 IST2018-10-31T00:01:41+5:302018-10-31T00:03:02+5:30
कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे.

१६० गुन्हेगारांवर तडीपारीची तलवार
- सचिन सागरे
कल्याण : कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. वारंवार गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या १६० जणांच्या तडीपारीला सुरुवात करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी ‘लोकमत’ला दिली. परिमंडळ ३ मध्ये ९० जणांवर तर परिमंडळ ४ मध्ये ७० जणांवर ही कारवाई करण्यात येणार आहे.
समाज विघातक प्रवृत्तींना शहरातून हद्दपार करण्यासाठी मुंबई पोलीस कायद्यात कलम ५५, ५६ आणि ५७ अन्वये तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार तडीपारीची कारवाई केली जाते. ज्या व्यक्तींपासून लोकांना भीती असेल किंवा धोका निर्माण होत असेल त्यांना कलम ५५ अन्वये; ज्यांनी मालमत्तेसंदर्भात गुन्हे केलेले असतील, मारामारी, हत्येचे गुन्हे केले असतील त्यांना कलम ५६ अन्वये आणि न्यायालयाने शिक्षा केलेले, काळाबाजारासंदर्भात गुन्हे केलेले असतील त्यांना कलम ५७ अन्वये तडीपार केले जात असल्याची माहिती दिघावकर यांनी दिली.
अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण अंतर्गत कल्याण परिमंडळ ३ आणि उल्हासनगर परिमंडळ ४ ही दोन परिमंडळे येतात. या दोन्ही परिमंडळातील पोलीस ठाण्याच्या हददीत मारामाºया, सोनसाखळी चोरी, गुंडांच्या टोळ्या, सराईत गुन्हेगारी, खंडणी गोळा करणारे, त्यांना मदत करणारे, घातक शस्त्राने गुन्हे करणाºया गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात येणार आहे. तडीपारीच्या १६० प्रस्तावांसोबतच काही जणांना एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध करण्यात येणार असल्याचेही दिघावकर यांनी सांगितले.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली शहरातील ४ टोळ्यांमधील २० जणांवर मकोकांतर्गत नुकतीच कारवाई करण्यात आली असून, २३ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. त्याचबरोबर बेकायदा अग्निशस्त्रांविरुद्ध राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत २१ अग्निशस्त्रे जप्त केली आहेत. गुंडांना तडीपार करण्याची मोहीम ठाण्यातही राबवण्यात आली होती. या कारवाईमध्ये सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले होते.