उपकेंद्रातील विद्यार्थी गुणपत्रिकेपासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 00:29 IST2020-12-06T00:26:36+5:302020-12-06T00:29:40+5:30
Education News : ठाण्यातील उपकेंद्रामध्ये ३६ विद्यार्थी एलएलबीचे शिक्षण घेत आहेत. चार वर्षे शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना एकाही वर्षाची गुणपत्रिका दिलेली नाही.

उपकेंद्रातील विद्यार्थी गुणपत्रिकेपासून वंचित
ठाणे - मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रातील विधी आणि न्याय शाखेच्या ३६ विद्यार्थ्यांना चार वर्षांपासून गुणपत्रिकाच दिली नसल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जबाबदार अधिकारीच उपस्थित नाहीत. या विद्यार्थ्यांना १५ दिवसांत गुणपत्रिका न दिल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर यांनी दिला आहे.
ठाण्यातील उपकेंद्रामध्ये ३६ विद्यार्थी एलएलबीचे शिक्षण घेत आहेत. चार वर्षे शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना एकाही वर्षाची गुणपत्रिका दिलेली नाही. केवळ सूचनाफलकावर निकाल जाहीर केला जातो. मात्र, हा निकाल जाहीर करताना कोणाला एटीकेटी लागली आहे, याची नोंद केली जात नसल्याने पुन:तपासणीसाठी अनेक विद्यार्थ्यांकडून ९९९ रुपये घेतले जातात. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण उत्तीर्ण झाले असल्याचे समजते. यातून मुलांचे आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात विचारणा करण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी नसतो. उपकेंद्राच्या समन्वयक म्हणून राऊत नावाच्या एक अधिकारी आहेत. मात्र, त्यादेखील तेथे उपस्थित नसतात.
विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असूनही स्वतंत्र फॅकल्टीची निर्मिती न करता तात्पुरत्या कारभारावर हे शिक्षण सुरू आहे. त्यामुळे चार वर्षांच्या परीक्षा देऊनही गुणपत्रिकाच मिळालेल्या नसल्याने अनेक विद्यार्थी वकिलीची सनदही मिळवू शकले नसल्याचे खामकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांशी साधला संवाद
nविक्रम खामकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्षा पल्लवी जगताप आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांनी शुक्रवारी मुंबई विद्यापीठाच्या बाळकुम येथील उपकेंद्राला भेट दिली.
nयावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता हा प्रकार उघडकीस आला. गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनाही ही बाब सांगितलेली असून १५ दिवसांत या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका दिल्या नाही, तर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही खामकर यांनी दिला आहे.