Students learned the importance of investing | विद्यार्थ्यांनी जाणून घेतले गुंतवणुकीचे महत्त्व
विद्यार्थ्यांनी जाणून घेतले गुंतवणुकीचे महत्त्व

डोंबिवली : बँकेच्या कामकाजाची माहिती व्हावी, कामकाज प्रत्यक्ष पाहता यावे, गुंतवणुकीचे फायदे, बँकेत खाते कसे उघडावे, याचे धडे पूर्वेतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच गिरवले.

मुले मोठी होत जातात तसतसे त्यांना व्यवहारज्ञान अवगत व्हावे आणि त्यातून योग्य प्रकारे पैसे हाताळण्याचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी शाळेने हा उपक्रम राबवला. इयत्ता सहावी आणि सातवीच्या १०० विद्यार्थ्यांनी नांदिवली येथील एका बँकेला भेट दिली. त्यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना बँकेत अथवा अन्यत्र विविध योजनांमध्ये गुंतवणुकीचे आणि निधी संकलनाचे महत्त्व समजावून सांगितले.

बँकांची आवश्यकता, बँकेतील विविध खात्यांचे प्रकार, बचत, कर्ज, व्यापार, महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांसाठीचे खाते, पेन्शन खाते, व्यावसायिक खाते, भागीदारी खाते आदी विविध खात्यांची माहिती विशद करण्यात आली. बँका ग्राहकांना कोणकोणत्या सुविधा देते, गुंतवणूकदारांना किती टक्के व्याज दिले जाते व त्याचे स्वरूप, विविध ठेवी योजना, कर्ज तसेच गृहकर्ज, शिक्षणासाठी, उच्चशिक्षणासाठी, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, सोन्यावरील कर्ज आदी प्रकारांचीही माहिती देण्यात आली.

तारण म्हणजे काय, गॅरेंटर म्हणजे काय? त्याची गरज तसेच कर्जाची परतफेड म्हणून बँक आकारत असलेले व्याज, कर्जाचा एकूण कालावधी, त्याच्या अटी, नियम, ते न पाळल्यास होणारी शिक्षा, ते वसुलीच्या उपाययोजना, त्याची पद्धत काय असते, हे थोडक्यात यावेळी
सांगण्यात आले.

विमा योजना, एटीएमकार्ड, डेबिटकार्ड, क्रेडिटकार्ड विविध धन योजना याविषयी बँकेच्या मुख्य व्यवस्थापक नलिनी गायकवाड, अश्विनी जोशी, योगेश बेंडाळे, अश्विनी काळे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. त्याबद्दल शाळेच्या शिक्षिका गीतांजली मुणगेकर, नयना पाटील यांनी बँक प्रशासनाचे आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही आगळ्यावेगळ्या माहितीतून खूप शिकायला मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Web Title: Students learned the importance of investing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.