जनावरांच्या वाहतुकीच्या अफवेमुळे तणाव, बदलापूरची घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 01:38 IST2019-06-26T01:38:41+5:302019-06-26T01:38:57+5:30
बंदी असलेल्या जनावरांची बेकायदा वाहतूक करून कत्तलीसाठी बदलापूरमध्ये आणली जात असल्याच्या संशयातून प्राणीमित्रांनी पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी पाहणी केली.

जनावरांच्या वाहतुकीच्या अफवेमुळे तणाव, बदलापूरची घटना
बदलापूर - बंदी असलेल्या जनावरांची बेकायदा वाहतूक करून कत्तलीसाठी बदलापूरमध्ये आणली जात असल्याच्या संशयातून प्राणीमित्रांनी पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी पाहणी केली. या पाहणीदरम्यान स्थानिक नागरिकांसोबत त्यांचा वाद झाला. या वादामुळे बदलापूर गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर गावातील कबरस्तानाजवळील आसपासच्या जागेत काही जनावरे कत्तलीसाठी आणली असल्याची माहिती मिळाल्याने सोमवारी रात्री उशिरा एका प्राणीमित्र संघटनेचे सदस्य त्याची माहिती घेण्यासाठी पोलिसांसह आला होता. त्या ठिकाणी कोणतेही जनावरे न मिळाल्याने पोलिसांनी आसपासच्या भागात पाहणी करण्यास सुरूवात केली. यावेळी काही व्यक्ती या परिसरात जमाव करुन एकत्रित आले. त्यांनी पोलीस आणि त्या प्राणीमित्रासोबत वाद घातला. तसेच त्या प्राणीमित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी धाव घेत जमावाला मारहाणीपासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव थांबत नसल्याने प्राणीमित्राने स्वसंरक्षणासाठी स्वत:जवळची परवानाधारक बंदूक काढून हवेत एक गोळी चालवली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्याचवेळी पोलिसांनीही जमावाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जमावाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकारानंतर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अफवेनंतर बदलापूर गावात मंगळवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते.
प्राणीमित्राच्या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पाहणी केल्यानंतर तेथे काहीही हाती लागले नाही. त्यावेळी स्थानिक जमावाने प्राणीमित्राला मारहाण केली. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या शांतता समितीची बैठक घेत बदलापूर गावात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे.
- प्रमोदकुमार शेवाळे,
पोलिस उपायुक्त,
परिमंडळ चार.