‘ती’ बांधकामे थांबवा, ठाणे शहर विकास विभागाचा आदेश; हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 07:29 IST2025-01-25T07:28:43+5:302025-01-25T07:29:04+5:30
Thane News: ठाणे पालिका क्षेत्रात बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण रोखण्यासाठीचे नियम न पाळल्यामुळे विकासकांना काम थांबवण्याचे आदेश देण्यास शहर विकास विभागाने सुरुवात केली आहे.

‘ती’ बांधकामे थांबवा, ठाणे शहर विकास विभागाचा आदेश; हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन
ठाणे - ठाणे पालिका क्षेत्रात बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण रोखण्यासाठीचे नियम न पाळल्यामुळे विकासकांना काम थांबवण्याचे आदेश देण्यास शहर विकास विभागाने सुरुवात केली आहे. नोटीस बजावलेल्या सात विकासकांनी नियमांची पूर्तता न केल्याने त्यांना काम थांबविण्याचे आदेश दिल्याची माहिती सहायक संचालक नगररचना संग्राम कानडे यांनी दिली.
पालिकेने धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी ३१७ बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्यापैकी
१८२ ठिकाणी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ९ लाख २५ हजारांचा दंड वसूल केला. नियमावलीचे पालन न करणाऱ्या १२० बांधकाम व्यावसायिकांना काम का थांबवू
नये यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
पडताळणीनंतरच निर्णय...
ज्यांनी नियमावलीचे पालन केले नाही अशा बांधकामस्थळांचा अहवाल प्राप्त झाल्यावर १४ ते १६ जानेवारीदरम्यान विकासकांना बांधकाम थांबविण्याच्या नोटिसा बजावल्या. काही विकासकांकडून नियमावलीची पूर्तता केली आहे. मात्र त्याची पडताळणी केल्यावरच बांधकाम पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे कानडे म्हणाले.
यांना बजावल्या नोटिसा
मौजे नौपाडा येथील मे. स्कायलाइन इन्फ्रा, मौजे ठाणे येथील सुयश पाटणकर, मौजे माजिवडे येथील मे. अष्टविनायक एंटरप्रायझेस, मे. पद्मनाभ डेव्हल्पर्स, मौजे पारसिक येथील मे. सरस्वती एंटरप्रायझेस, मे. जय प्रॉपर्टीज, मौजे कळवा येथील मे. सिद्धिविनायक डेव्हलपर्स यांना नोटीस बजावल्या आहेत.