एसटी बसचे चाक थांबले, डिझेल टाकायला पैसे नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 07:27 IST2021-04-10T00:40:03+5:302021-04-10T07:27:02+5:30
वाड्यात वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय

एसटी बसचे चाक थांबले, डिझेल टाकायला पैसे नाहीत!
- वसंत भोईर
वाडा : गाव तिथे एसटी असे ब्रीद असलेली एसटी ही सर्वसामान्यांचे प्रवासाचे साधन ठरलेली आहे; मात्र विविध कारणांनी आधीच संकटात असलेली एसटी पुन्हा एकदा संकटात सापडली आहे. दरम्यान, वाडा आगारात असलेला डिझेलचा साठा संपल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे ग्रामीण व शहरी भागात जाणाऱ्या प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय होत आहे.
वाडा आगारातून दररोज तालुक्याच्या ग्रामीण भागात बसच्या १२५ फेऱ्या तर शहरी भागात १०० च्या वर फेऱ्या मारल्या जातात. यातून प्रवाशांची ने-आण केली जाते. ग्रामीण भागात एसटी बसशिवाय पर्याय नसल्याने प्रवासी बसवरच अवलंबून असतात. कमी पैशांत बस आपल्या नियोजित स्थळी पोहोचवते. मात्र गुरुवारी सकाळी वाडा एसटी आगारात असलेला डिझेलचा साठा संपल्याने १० वाजल्यापासून संपूर्ण बस बंद असून आगारात उभ्या आहेत. यामुळे प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय झाली आहे.
कोरोनामुळे ओढवले आर्थिक संकट
गेले वर्षभर राज्याप्रमाणेच जिल्ह्यातही कोरोनाचे संकट असल्याने हे वर्ष आर्थिक तोट्याचेच गेले; मात्र अलीकडे एसटीचे चाक पुन्हा रुळावर येत आहे, असे वाटत असतानाच राज्यासह जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा एकदा प्रवासी संख्या रोडावली आहे. यामुळे एसटीवर आणखी आर्थिक संकट ओढवणार आहे.
मुरबाड, शहापूर, कल्याणपाठोपाठ वाडा आगाराचाही डिझेल साठा संपल्याने बस आगारात उभ्या आहेत. वाडा आगाराला डिझेलचा साठा वाशी येथून पुरवला जातो. डिझेल संपल्याचे वरिष्ठ कार्यालयाकडे कळवण्यात आले आहे.
- मधुकर धांगडा,
आगारप्रमुख, वाडा आगार