मेगा ब्लॉकसाठी एसटी आणि टीएमटी सज्ज; टीएमटीच्या अतिरिक्त ५० तर एसटीच्या २२ बस धावणार
By अजित मांडके | Updated: May 30, 2024 18:24 IST2024-05-30T18:23:22+5:302024-05-30T18:24:04+5:30
ठाणे परिवहन सेवेच्या माध्यमातून या तीन दिवसात रोज अतिरिक्त ५० बस उपलब्ध करुन देणार आहे. सध्या परिवहनच्या ताफ्यात ३५० बस असून त्या व्यतिरिक्त या बस उपलब्ध असणार आहेत

मेगा ब्लॉकसाठी एसटी आणि टीएमटी सज्ज; टीएमटीच्या अतिरिक्त ५० तर एसटीच्या २२ बस धावणार
ठाणे - रेल्वेच्या वतीने तीन दिवस मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहे, हे हाल टाळण्यासाठी ठाणे परिवहन सेवेकडून अतिरिक्त बसची सुविधा ठाणे ते मुलुंड आणि ठाणे दिवा अशी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी ५० अतिरिक्त बस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती परिवहनच्या वतीने देण्यात आली आहे. दुसरीकडे ठाणे एसटी विभागाकडून देखील कल्याण, ठाणे येथून भिवंडी, नाशिक, पूणे आदी मार्गवर अतिरिक्त २२ बस सोडल्या जाणार आहेत.
सीएसएमटी येथील फलटांच्या रुंदीकरणासह ठाणे येथील फलटांच्या कामांसाठी तीन दिवसांचा जेम्बो मेगाबॉल्क घेण्यात आला आहे. परंतु या कालावधी कामावर जाणाऱ्या आणि कामावरुन घरी जाणाºया प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी ठाणे परिवहन सेवा देखील आता प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. ठाणे परिवहन सेवेच्या माध्यमातून या तीन दिवसात रोज अतिरिक्त ५० बस उपलब्ध करुन देणार आहे. सध्या परिवहनच्या ताफ्यात ३५० बस असून त्या व्यतिरिक्त या बस उपलब्ध असणार आहेत. परंतु या ५० बस मुलुंड ते ठाणे आणि ठाणे ते दिवा या मार्गावर सोडल्या जाणार असल्याची माहिती परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली. रेल्वे कडून आलेल्या पत्रानुसार या मार्गावर बस सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे या तीन दिवसांच्या कालावधी ठाणे एसटी विभाग देखील सज्ज झाला आहे. एसटी विभागाकडून कल्याण ते ठाणे, ठाणे ते कल्याण, ठाणे ते पूणे, ठाणे ते भिवंडी, खोपट (ठाणे) ते नाशिक, वंदना (ठाणे) ते पूणे या मार्गांवर रोजच्या बस व्यतिरिक्त अतिरिक्त २२ बस उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती ठाणे एसटी विभागाने दिली.