ठाणे जिल्ह्यात ‘नव भारत साक्षरता’ चाचणीस उत्स्फूर्त प्रतिसाद; १४ हजारांनी दिली मूल्यमापन चाचणी

By सुरेश लोखंडे | Updated: September 22, 2025 18:01 IST2025-09-22T18:00:58+5:302025-09-22T18:01:57+5:30

सर्वाधिक ८० टक्के महिलांची या परीक्षेला उपस्थिती हाेती, असा दावा ठाणे जिल्हा परिषदेच्या याेजना शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.      

spontaneous response to nav bharat saksharta test in thane district 14 thousand people took the assessment test | ठाणे जिल्ह्यात ‘नव भारत साक्षरता’ चाचणीस उत्स्फूर्त प्रतिसाद; १४ हजारांनी दिली मूल्यमापन चाचणी

ठाणे जिल्ह्यात ‘नव भारत साक्षरता’ चाचणीस उत्स्फूर्त प्रतिसाद; १४ हजारांनी दिली मूल्यमापन चाचणी

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यात ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा रविवारी ठाणे जिल्ह्यातील एक हजार ९६८ परीक्षा केंद्रांवर पार पडली. या चाचणीसाठी एकूण १९ हजार ८२८ परीक्षार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी १४ हजार ९६ असाक्षरांनी चाचणीला उपस्थिती लावली. यामध्ये सर्वाधिक ८० टक्के महिलांची या परीक्षेला उपस्थिती हाेती, असा दावा ठाणे जिल्हा परिषदेच्या याेजना शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.            

केंद्र सरकारच्या ‘उल्लास’ अॅपच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या असाक्षर प्रौढांसाठी ही चाचणी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील ही पहिली मूल्यमापन चाचणी असून दुसरी चाचणी परीक्षा मार्चमध्ये घेण्यात येणार आहे. या पार पडलेल्या चाचणी परीक्षेसाठी मीरा भाईंदर महापालिका शहरातून तीन हजार ९ जणांची नाेंदणी झाली हाेती. तर या परीक्षेला सर्वाधिक एक हजार ७५५ जणांची उपस्थिती शहापूर तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर हाेती. याप्रमाणेच उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड व भिवंडी तालुक्यांमध्येही समाधानकारक प्रतिसाद हाेता. जिल्ह्यातील एकूण १९६८ परीक्षा केंद्रांवर ही मूल्यमापन चाचणी घेण्यात आली.

पुढील टप्यात डिजिटल साक्षरता -

ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने साक्षरतेचा पाया मजबूत करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण चाचणी आयोजित केली असून, या माध्यमातून असाक्षर प्रौढांना ‘नवसाक्षर’ बनविण्याचे उद्दिष्ट आहे. चाचणीमुळे त्यांचा भाषा व गणितातील प्राथमिक ज्ञानावर आधारित प्रगतीचा आढावा घेता येणार आहे. या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करून यशस्वी उमेदवारांना नवसाक्षरतेचा दर्जा देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात डिजिटल साक्षरता व कौशल्यविकासाचे प्रशिक्षण देण्याचा विचार शिक्षण विभाग करत आहे.

एकूण आकडेवारी:

एकूण नोंदणी - १९,८२८

एकूण उपस्थित परीक्षार्थी - १४,०९६

एकूण परीक्षा केंद्रे - १,९६८

महिला परीक्षार्थी - ११,३९४

पुरुष परीक्षार्थी - २,७०२

Web Title: spontaneous response to nav bharat saksharta test in thane district 14 thousand people took the assessment test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.