बाळकूम, कोलशेत,ढोकाळीमध्ये उत्स्फूर्त लॉकडाऊन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 14:46 IST2020-06-27T14:45:24+5:302020-06-27T14:46:01+5:30

वाढत्या रुग्णसंख्येनंतर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा निर्णय 

Spontaneous lockdown in Balkum, Kolshet, Dhokali | बाळकूम, कोलशेत,ढोकाळीमध्ये उत्स्फूर्त लॉकडाऊन 

बाळकूम, कोलशेत,ढोकाळीमध्ये उत्स्फूर्त लॉकडाऊन 

ठाणे : ठाण्यात अनलॉकनंतर गेल्या १५ दिवसात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर आता माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या अंतर्गत येत असलेल्या कोलशेत ,ढोकळी आणि बाळकूम परिसरात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीच या भागात ७ दिवस उत्सुर्तपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून हा लॉकडाऊन सुरु करण्यात आला असून यामध्ये केवळ मेडिकल,हॉस्पिटल,आणि दुध व्यवसायच सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी नागरिकांकडूनच केली जाणार असून स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन करणारे ठाण्यातील हे पहिले परिसर आहेत. 

  ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून अनलॉकनंतर तर यामध्ये आणखी भर पडली आहे. रुग्णावढीचा वेग देखील वाढला असून दररोज १५० पेक्षा अधिक रुग्णांची भर पडत आहे. रविवारी तर रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असून संपूर्ण ठाणे शहरात २६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत सर्वाधिक ६४ नव्या रुग्णांची नोंद झाली असल्याने इथल्या रहिवाशांमध्ये चिंतेचे वातारण आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नागरसेवक संजय भोईर यांनी बाळकूम, कोलशेत आणि ढोकाळी परिसरातील काही सोसायटी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांनाची बैठक घेतली असून या बैठकीमध्ये स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये आजपासून पुढील सात दिवस हा लॉकडाऊन असणार आहे अशी माहिती भोईर यांनी दिली आहे. 


         या लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवा,मेडिकल,हॉस्पिटल्स,रुग्णवाहिका तसेच दूध व्यवसाय  (सकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत )वगळून सर्व प्रकारचे किराणा स्टोअर्स,भाजीपाला,मच्छी विक्रेते, मटण चिकन विक्रेते सात दिवस बंद राहणार आहे. कोरोना हटाव बाळकूम, कोलशेत,ढोकाळी बचाव अशा आशयाच्या पोस्ट देखील या परिसरात सोशल मीडियावर टाकण्यात आल्या आहेत. 

" अनलॉक नंतरच रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या परिसरात २५० पेक्षा अधिक सोसायटी असून तेवढाच ५० टक्के भाग हा झोपडपट्टीचा भाग आहे. त्यामुळे या ठिकाणचे व्यवसाय पुन्हा सुरू झाले, सोशल डिस्टेंसिंगचे पालन न केल्यामुळे संख्या वाढली असून याला आळा घालण्यासाठी हा सात दिवसांचा लॉकडाऊन उत्स्फूर्तपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना देखील लॉकडाऊन हवा होता . तरच ही साखळी तुटण्याची शक्यता आहे. 
                                                                                                   - संजय भोईर, नगरसेवक , ठा.म.पा 


"काही दिवस अनलॉक करून पुन्हा लॉकडाऊन करणे आवश्यक होते. मात्र तसे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले नाही. परिणामी रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे प्रशासनाची वाट न बघता आपल्या सुरक्षितेसाठी स्वतःहुन लॉकडाऊन करण्याची आवश्यकता होती.
                                                                                                  - ओमप्रकाश पाटील, रहिवासी, बाळकूम

Web Title: Spontaneous lockdown in Balkum, Kolshet, Dhokali