ठाण्यात विशेष क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम; आरोग्य पथक करणार तपासणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 06:17 PM2020-03-11T18:17:16+5:302020-03-11T18:18:00+5:30

ठाणे जिल्ह्यात विशेष क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम दिनाक १६ ते २३ मार्च २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

Special Tuberculosis and Leprosy Research Campaign in Thane; Health squad investigations | ठाण्यात विशेष क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम; आरोग्य पथक करणार तपासणी 

ठाण्यात विशेष क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम; आरोग्य पथक करणार तपासणी 

Next

ठाणे : जिल्ह्यात विशेष क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम दिनाक १६ ते २३ मार्च २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ही मोहीम भिवंडी, कल्याण या ग्रामीण तालुक्यासह ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, या महानगर पालिका क्षेत्रात राबविण्यात येणार असून या मोहिमेत सर्व शासकीय व अशासकीय संस्थांनी सक्रीय सहभाग घेऊन मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने यांनी केले आहे. या अनुषंगाने आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  यांच्या दालनात समन्वय सभा संपन्न झाली. यावेळी सहायक संचालक डॉ. गीता खरात-काकडे यांनी मोहिमे विषयी सविस्तर माहिती दिली.

ही मोहीम अतिजोखीमग्रस्त भागात राबविण्यात येणार असून यामध्ये झोपडपट्टी, वीटभट्टी, भटक्या जमाती, कामासाठी स्थलांतरीत, खाणीमध्ये काम करणारे बेगर कामगार,आदि सामाजिक गट तसेच तुरुंग, वृद्धाश्रम, आश्रमशाळा, वस्तीगृह, मनोरुग्णालय आदि. ठिकाणाचा समावेश असणार आहे.  

अतिजोखीम ग्रस्त लोकसंख्या असणाऱ्या भागात क्षयरोग व कुष्ठरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीस त्वरित शोधून त्यांची  वैदकीय अधिकारी  यांच्या कडून तपासणी व योग्य औषधोपचार तातडीने सुरु करता यावा या दृष्टीकोनातून प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी पथकामार्फत गृहभेटीद्वारे, घरोघरी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे.

या बैठकीला डॉ. एस.पी. शिंदे, डॉ. बी. डी. चकोर, डॉ. खुशबू टावरी, डॉ. प्रिया फडके, डॉ. अंजली चौधरी, डॉ. बी. के, पवार, अर्चना देशमुख, डी.निपुर्ते, स्वप्नाली पवार, दत्तात्रय वसईकर आदि उपस्थित होते.

क्षयरोगाची संशयित लक्षणे- 

दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला, दोन आठवड्यापेक्षा जास्त ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठ,

 कुष्ठरोगाची संशयित लक्षणे- 

त्वेचेवर फिकट, लालसर बधिर चट्टा त्यावर घाम न येणे, जाड, बधीर, तेलकट, चमकणारी त्वचा, त्वेचेवर गाठी असणे , कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद न करता येणे, तळ हातावर तळपायांवर मुंग्या येणे, बधिरपणा अथवा जखमा असणे, हातापायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय  घोट्यापासून लुळा पडणे, हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणविणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे.

Web Title: Special Tuberculosis and Leprosy Research Campaign in Thane; Health squad investigations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.