दोष सिद्धीसाठी विशेष कामगिरी: उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांचा विशेष गौरव

By जितेंद्र कालेकर | Published: February 24, 2024 08:32 PM2024-02-24T20:32:03+5:302024-02-24T20:33:21+5:30

ठाणे विधी सेवा प्राधिकरणाकडून सत्कार: १६६ आरोपींना ४० लाखांचा दंड

special achievement for conviction special commendation to excise officers | दोष सिद्धीसाठी विशेष कामगिरी: उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांचा विशेष गौरव

दोष सिद्धीसाठी विशेष कामगिरी: उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांचा विशेष गौरव

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राष्ट्रीय लोकन्यायालयात दोष सिद्धीसाठी विशेष कामगिरी करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह १२ अधिकाऱ्यांचा ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. सलग तीन लोकअदालतींमध्ये १६० गुन्हे दाखल झाले. यामध्ये १६६ आरोपींकडून ४० लाख ५१ हजारांचा दंड वसूल केला. याचीच दखल घेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ईश्वर सूर्यवंशी यांनी या अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केल्याची माहिती अधीक्षक डाॅ. निलेश सांगडे यांनी शनिवारी दिली. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांच्या संकल्पनेतून दोष सिद्धीचा ठाणे पॅटर्न उत्पादन शुल्क विभागात राबविण्यात आला. याच पॅटर्नमुळे गेली अनेक वर्ष सुरु असलेले दारु विक्रेते, निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरुद्धचे खटले निकाली काढण्यात आले. यात आरोपींनी गुन्हा कबूल केल्यामुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्याही कमी झाली. शिवाय, दोष सिद्धीचे प्रमाणही वाढले. यापूर्वी आरोपी समोर न आल्यामुळे हे खटले प्रलंबित राहिले होते. मात्र, यात आरोपी आणि त्यांच्या कुटूंबीयांचे कसे नुकसान होते, याचे समुपदेशन उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी केले. त्यामुळेच ३० एप्रिल २०२३ तसेच ९ सप्टेंबर २०२३ आणि ९ डिसेंबर २०२३ या तीन लोकअदालतींमध्ये उत्पादन शुल्कच्या दोष सिद्धीचे प्रमाण वाढले.

त्याद्वारे १६६ आरोपींकडून ४० लाख ५१ हजारांचा दंड वसूलही झाला. याच कामगिरीसाठी ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे, कल्याणचे निरीक्षक संजय भोसले, दुय्यम निरीक्षक रुपेश चव्हाण, किरण पवार तसेच सी विभागाचे निरीक्षक अशोक देसले, दुय्यम निरीक्षक रमेश कोलते, रत्नाकर शिंदे तर डी विभागाचे निरीक्षक संजय ढेरे, दुय्यम निरीक्षक रामलिंग सूर्यवंशी, अंकुश अवताडे आणि बी विभागाचे निरीक्षक राजेंद्र शिरसाठ, दुय्यम निरीक्षक शब्बीरअली शेख आणि मनोज संबोधी यांचा विधी सेवा प्राधिकरणाने सत्कार केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पहिल्यांदाच दोष सिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी कारवाई केली अशा शब्दात न्या. सूर्यवंशी यांनी या अधिकाऱ्यांचे काैतुक केले. यापुढील लाेकअदालतींमध्येही अशीच गुणात्मक कामगिरी केली जाईल, असे डाॅ. सांगडे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: special achievement for conviction special commendation to excise officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.