सासुरवाडीतून जावयाचे अपहरण; ५० हजारांच्या खंडणीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 07:56 IST2026-03-06T07:56:02+5:302026-03-06T07:56:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : मुंब्रा येथून भिवंडीतील शांतीनगर येथे सासुरवाडीला आलेल्या जावयाचे अपहरण करून कुटुंबीयांकडून ५० हजारांच्या खंडणीच्या ...

सासुरवाडीतून जावयाचे अपहरण; ५० हजारांच्या खंडणीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : मुंब्रा येथून भिवंडीतील शांतीनगर येथे सासुरवाडीला आलेल्या जावयाचे अपहरण करून कुटुंबीयांकडून ५० हजारांच्या खंडणीच्या मागणीची घटना भिवंडीत घडली. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.
शेरू ऊर्फ सादिक समीर अन्सारी (३१), मोहम्मद फिरोज अब्दुल्ला खान (२२), तौशिफ हुसेन शेख (१९) अशी अटक आरोपींची नावे आहेत, तर जाहिद अली व अन्य एक साथीदार फरार आहे. हैदर अस्लम सय्यद (२३) असे अपहरण झालेल्या जावयाचे नाव आहे. तो शांतीनगर येथे सासुरवाडीला आला असता पाच जणांनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर हैदरची बहीण निगार तौसिफ पठाण हिला फोन करून ५० हजारांची खंडणी मागितली.
बंद गाळ्यातून हैदरची सुटका
निगार पठाण यांनी शांतीनगर पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी डोंगरीपाडा येथील गाळ्यातून हैदरची सुटका केली. सादिक, फिरोज व तौशिफ या तिघांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.