स्मार्ट गव्हर्नन्स, सुरक्षित शहर, इंटिग्रेटेड ट्रान्झिस्टला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:09 AM2019-01-30T00:09:47+5:302019-01-30T00:10:26+5:30

२४३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मिळाली मंजुरी

Smart Governance, Safe City, Integrated Transistor Preferred | स्मार्ट गव्हर्नन्स, सुरक्षित शहर, इंटिग्रेटेड ट्रान्झिस्टला प्राधान्य

स्मार्ट गव्हर्नन्स, सुरक्षित शहर, इंटिग्रेटेड ट्रान्झिस्टला प्राधान्य

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवलीस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी तयार केलेल्या स्मार्ट गव्हर्नन्स, सुरक्षित शहर, इंटिग्रेटेड ट्रान्झिस्ट आणि जीआयएस या चार सविस्तर प्रकल्प अहवालांना स्मार्ट सिटी कंपनीने सोमवारी झालेल्या १२ व्या बैठकीत मंजुरी दिली आहे. हे चार प्रकल्प २४३ कोटी ५६ लाख रुपये खर्चाचे असून, त्यासाठी लवकरच निविदा मागविली जाणार आहे.

स्मार्ट गव्हर्नन्स हा प्रकल्प ३३ कोटी १० लाख रुपयांचा आहे. तर, सुरक्षित शहर प्रकल्प १६९ कोटी ७९ लाख रुपये, इंटिग्रेटेड ट्रान्झिस्ट केडीएमटीसाठी २९ काटी ४५ लाख आणि जीआयएसप्रणाली विकसित करण्यासाठी ११ कोटी २२ लाख रुपये खर्च होणार आहेत.
ई-गव्हर्नन्स प्रणाली राबवणारी केडीएमसी ही राज्यातील पहिली महापालिका आहे. केडीएमसीच्या या प्रणालीचा वापर सध्या राज्यभरात होत आहे. त्यापोठापाठ आता स्मार्ट गर्व्हनन्स प्रकल्पात २३ मॉड्युल विकसित केले जाणार आहेत. त्यात मालमत्ताकर, पाणी देयके, वित्त व लेखा विभाग, सिटी पोर्टल, मोबाइल अ‍ॅप्लिकेशन, विवाह व जन्म मृत्यू नोंदणी, परवाने, नागरी सुविधा केंद्र, तक्रार निवारण, माहिती अधिकार सेवा, शहर अभियांत्रिकी, जमीन व मालमत्ता व्यवस्थापन, इमारत नकाशा मंजुरी, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य योजना, कल्याणकारी योजना, कायदा व्यवस्थापन, दस्ताऐवज व्यवस्थापन आणि प्लिंथ मॅनेजमेंट यांचा समावेश असणार आहे. या विभागांच्या सेवा अधिक गतमान केल्या जाणार आहेत.

स्मार्ट व सुरक्षित शहरासाठी शहरांतील प्रमुख चौकात सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित केली जाणार आहे. त्यात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. तसेच शहराच्या पर्यावरणाची स्थिती दाखवणारी सेन्सर प्रणाली असेल. त्यामुळे पावसाळ्यात पर्जमापन, पूरस्थिती वैगरे स्थिती पूर्वसूचना देता येणार आहे. स्मार्ट सिटी आॅपरेशन व सर्व्हिलन्स कमांड सेंटर विकसित केले जाणार असून, ड्रोनद्वारे शहरावर नजर ठेवली जाईल.

इंटिग्रेटेड ट्रान्झिस्ट सिस्टममध्ये सर्व समावेशक व स्वयंचलित वाहतूक व्यवस्थापन असेल. त्यात कल्याण-डोंबिवली परिवहन बस सेवेचा समावेश केला आहे. त्यात स्वयंचलित भाडे संकलन, स्थानक व्यवस्थापन, बसचे वेळापत्रक, कार्यशाळा व्यवस्थापन, स्वयंचलित वाहनस्थान प्रणाली, प्रवासी माहिती प्रणाली विकसित केली जाणार आहे. जीआयएस प्रणालीत जीएसआयचा प्लॅटफॉर्मची खरेदी करणे. तसेच जीआयएस अ‍ॅप्लिकेशन सुधारित करणे, उपग्रह प्रतिमा खरेदी करणे, जीआयएस आधार नकाशा अंतिम करणे, याचा समावेश आहे.

प्रमोद कुलकर्णी यांच्याकडे पदभार
स्मार्ट सिटी कंपनीच्या जनरल मॅनेजर पदाच्या भरतीसाठी चार उमेदवारांचे अर्ज आले. मात्र, मुलाखतीत ते चारही उमेदवार अपात्र ठरले. पुन्हा मुलाखतीसाठी अर्ज मागवले असता आठ जणांचे अर्ज आले. नमूद केलेल्या अनुभवानुसार आठही उमेदवार पात्र नसल्याने मुलाखतीच झाल्या नाहीत.
त्यानंतर कंपनीने अजित शर्मा यांची जनरल मॅनेजरपदी नियुक्ती केली. त्यांनी पदावर रूजू होण्यास असमर्थता दर्शविल्याने सहा महिन्यांसाठी प्रमोद कुलकर्णी यांची नियुक्त करण्यास मंजुरी दिली
गेली आहे.
कुलकर्णी हे महापालिकेतील शहर अभियंता पदावरून निवृत्त होत असल्याने त्यांना ही जबाबदारी दिली आहे. त्यांनी स्मार्ट सिटीच्या सुरुवातीपासून काम पाहिले आहे.

Web Title: Smart Governance, Safe City, Integrated Transistor Preferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.