मीरा भाईंदर मध्ये कारशेड साठी झाडे तोडण्यास विरोध करत स्वाक्षरी मोहीम सुरूच
By धीरज परब | Updated: May 4, 2025 21:39 IST2025-05-04T21:38:15+5:302025-05-04T21:39:15+5:30
Mira Road: मेट्रो कारशेड साठी उत्तन - डोंगरी येथील १२ हजार ४०० झाडे तोडण्याच्या एमएमआरडीएच्या प्रस्तावा विरोधात मीरा भाईंदर शहरात ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहिमा सुरूच आहेत. झाडे तोडण्यास आणि हजारो पक्षी, वन्यजीव यांना उध्वस्त करू नका अशी मागणी नागरिक करत आहेत.

मीरा भाईंदर मध्ये कारशेड साठी झाडे तोडण्यास विरोध करत स्वाक्षरी मोहीम सुरूच
मीरारोड - मेट्रो कारशेड साठी उत्तन - डोंगरी येथील १२ हजार ४०० झाडे तोडण्याच्या एमएमआरडीएच्या प्रस्तावा विरोधात मीरा भाईंदर शहरात ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहिमा सुरूच आहेत. झाडे तोडण्यास आणि हजारो पक्षी, वन्यजीव यांना उध्वस्त करू नका अशी मागणी नागरिक करत आहेत.
भाईंदर पश्चिमेस खाऊ गल्ली जवळ संत विन्सेंट दि पॉल शाळेच्या कल्पना चावला गाईड कंपनीच्या विद्यार्थिनींनी झाडे तोडू नका अशी मागणी करत सह्यांची मोहीम चालवली. शाळेच्या संचालिका ममता मोरायस सह त्यांच्या सहकारी ह्यावेळी उपस्थित होत्या. विद्यार्थिनींनी, नागरिकांना निसर्गरम्य अश्या डोंगर परिसरातील १२ हजार ४०० झाडे काढण्या बद्दल आणि तेथील विविध प्रजातींचे हजारो पक्षी, वन्य जीव देखील नष्ट होऊन निसर्गाची मोठी हानी होणार असल्याची माहिती दिली. नागरिकांनी देखील झाडे तोडण्यास विरोध दर्शवत सह्यांच्या मोहिमेत सहभाग नोंदवला.
मीरारोडच्या रामदेव पार्क येथील मीनाताई ठाकरे सभागृह जवळ बविआचे निलेश साहू यांनी रोज सायंकाळी झाडे तोडू नये म्हणून स्वाक्षरी मोहीम चालवली आहे. उत्तन नाका येथे दिव्यांग आधार संस्थेच्या दिव्यांगांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. मीरारोड भागात मराठी एकीकरण समितीने तर भाईंदर पश्चिमेस काँग्रेस कार्यालय व शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेत झाडे तोडून नागरिकांचा ऑक्सिजन हिरावून घेऊ नका म्हणून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
भाईंदरच्या चौक आणि पाली गावात रविवारी उत्सवाच्या निमित्ताने झाडे तोडून कारशेड करण्यास विरोध करत स्वाक्षरी मोहिमा राबवण्यात आल्या. तर मीरारोड येथील कनकीया भागात सावित्रीबाई फुले उद्यान जवळ झाडे तोडण्यास विरोध दर्शवणारी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. भाईंदर पश्चिम भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी झाडे वाचवण्यासाठी सह्या घेतल्या. या शिवाय शहरातील अनेक नागरिक, विविध संस्था व राजकीय पक्षाचे अनेक पदाधिकारी देखील झाडे तोडू नये म्हणून स्वाक्षरी अभियानात सहभागी झाले आहेत. चे सांगत चे एमएमआरडीए ने प्रस्तावित केले असले तरी प्रत्यक्ष झाडांची संख्या मोठी आहे.
कारशेडसाठी मेट्रो स्टेशन जवळ मोकळ्या जमिनी असताना थेट डोंगरावर १२ हजार ४०० झाडे तोडून कारशेड बनवण्यास नागरिकांनी विरोध दर्शवला. आधीच तापमान खूप वाढले आहे. प्रदूषण वाढले आहे. त्यात ऑक्सिजन देणारी व तापमान आणि प्रदूषण कमी करणारी झाडे इतक्या मोठ्या संख्येने तोडणे निंदनीय असल्याचा संताप नागरिकांनी बोलून दाखवला.