भिवंडी-वाडा रोडच्या दुरुस्तीसाठी श्रमजीवीचा एल्गार; महामार्ग तब्बल तीन तास रोखला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 16:43 IST2021-07-13T16:43:12+5:302021-07-13T16:43:41+5:30
Wada-Bhiwandi highway: अंबाडी नाक्यासह पूर्ण महामार्गावर १३ ठिकाणी श्रमजीवी संघटनेने रास्ता रोको आंदोलन करीत तब्बल ३ तास रस्ता रोखून धरला होता.

भिवंडी-वाडा रोडच्या दुरुस्तीसाठी श्रमजीवीचा एल्गार; महामार्ग तब्बल तीन तास रोखला
- नितिन पंडीत
भिवंडी - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनमानी व बेजबाबदार कामामुळे भिवंडी वाडा मनोर महामार्ग खड्ड्यात गेला आहे. या विरोधात मंगळवारी श्रमजीवी संघटनेने दणका दिला. अंबाडी नाक्यासह पूर्ण महामार्गावर १३ ठिकाणी श्रमजीवी संघटनेने रास्ता रोको आंदोलन करीत तब्बल ३ तास रस्ता रोखून धरला होता. दोन वर्षांपूर्वी श्रमजीवी संघटनेचे युवा नेते प्रमोद पवार यांनी डॉ.नेहा शेख यांच्या अपघाती मृत्यूनंतर टोल नाका तातडीने बंद पाडला होता. त्यानंतर या रस्त्याची पूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची होती. मात्र नेहमीच ठेकेदार पोसणाऱ्या या विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून फक्त अपहार केला असल्याने या रस्त्याची पुरता दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांसह वाहन चालकांना जीव मुठीत धरून या महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे.
मंगळवारी श्रमजीवी संघटनेने दिलेक्या दणक्याने पूर्ण जिल्हा हादरून गेला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे चांगलेच ढाबे दणाणले आहेत. .भिवंडी तालुक्यातील कवाड,अनगाव, पालखणे,वारेट, दुगाड,अंबाडी, दिघाशी फाटा यांसह वाडा तालुक्यातील प्रमुख ठिकाणी असे तब्बल तेरा ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.
अंबाडी नाक्यावर प्रमोद पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी भर पावसात भिजून ३ तास महामार्ग रोखला होता. श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा,कार्याध्यक्ष स्नेहा दुबे, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड,अशोक सापटे,जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार आदी श्रमजीवीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी भेटी देत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचे बळ वाढविले.