राबोडीतील तरुणावर गोळीबार; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:40 IST2021-05-26T04:40:18+5:302021-05-26T04:40:18+5:30
ठाणे : काही किरकोळ कारणावरून मनात राग धरून दोघांनी मोहमद जैद मंजूर खान (३०) यांच्यावर चाकूने हल्ला करून पिस्तुलातून ...

राबोडीतील तरुणावर गोळीबार; एकास अटक
ठाणे : काही किरकोळ कारणावरून मनात राग धरून दोघांनी मोहमद जैद मंजूर खान (३०) यांच्यावर चाकूने हल्ला करून पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना राबोडीत मंगळवारी घडली. या हल्ल्यात खान गंभीर जखमी झाले असून, गोळी चुकल्याने ते थोडक्यात बचावले आहेत. याप्रकरणी संशयित शबीर अब्दुल गौस (३०) यास राबोडी पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न व हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. खान हे नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतात. ते त्यांचा मित्र इम्रान खान उर्फ बंटी यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. त्याचाच राग शबीर याच्या मनात होता. शबीर हा खान यांना त्यांच्यासोबत राहण्यास सांगत असे. दरम्यान, मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास खान राबोडीतील रफ्तार हाऊसजवळील तपासेनगर या ठिकाणी आपल्या मित्रांसोबत बसलेले होते. त्याचवेळी शबीर त्याच्या एका साथीदारासह मोटारसायकलवरून तिथे आला. शबीरने त्यांना मोटारसायकलवर बसण्याचा आग्रह धरला. मात्र, खान यांनी नकार दिला. याचाच राग आल्याने शबीर आणि त्याच्या साथीदाराने खान यांना मारहाण केली. त्यानंतर शबीरच्या साथीदाराने चाकूने खान यांच्या हातावर वार केले. त्यावेळी शबीर शेख याने तूम बहोत भाई बनते हो, अभी मै तुझे जिंदा नही छोडूंगा असे म्हणून पिस्तूलच्या मागील बाजूने खान यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर पिस्तूलमधून एक राउंड खान यांच्या दिशेने गोळीबारही केला. मात्र, गोळी चुकल्याने खान या घटनेतून थोडक्यात बचावले. शबीर आणि त्याचा साथीदार मोटारसायकलवरून पळून गेले. मात्र, हल्ल्यात खान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले.