उल्हासनगरात जेलमधून बाहेर आलेल्यावर गोळीबार, मोहित हिंदुजासह सहा जणावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 19:02 IST2025-11-22T19:02:47+5:302025-11-22T19:02:59+5:30
पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

उल्हासनगरात जेलमधून बाहेर आलेल्यावर गोळीबार, मोहित हिंदुजासह सहा जणावर गुन्हा
उल्हासनगर: शिक्षा भोगून जेल मधून बाहेर आलेल्या सचिन उर्फ बाहुजी बहादूर करोतिया याच्यावर शुक्रवारी रात्री गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मोहित हिंदुजा यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३, इमलीपाडा येथील गोगाजी मंदिर येथे शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास शिक्षा भोगून आलेला सचिन उर्फ बाहुजी बहादूर करोतिया हा मित्रासोबत उभा होता. त्यावेळी दोन मोटरसायकलींवरून आलेल्या सहा जणांच्या टोळक्यातील मोहित हिंदुजा नावाच्या तरुणांनी दोन राऊंड करोतिया याच्या दिशेने शूट केले. तसेच परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.
परंतु सुदैवाने करोतियाला कोणतीही दुखापत झाली नसल्याने, मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर मध्यवर्ती पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मोहित हिंदुजा यांच्यासह अन्य जणावर गुन्हा दखल झाला. माजी महापौराकडून गस्त वाढविण्याची मागणी फॉरवर्ड लाईन चौक परिसरात अशा अप्रिय घटना वारंवार घडत असल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. माजी महापौर मालती करोतिया यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी तात्काळ पोलिसांनी या परिसरात गस्त (पेट्रोलिंग) वाढवावी आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखावी, अशी मागणी केली.