धक्कादायक! ठाण्यात २१ व्या मजल्यावरुन कोसळून तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 23:45 IST2021-07-08T23:42:52+5:302021-07-08T23:45:45+5:30
माजीवडा भागातील वसंत लॉन्स येथील ‘सवाना’ या इमारतीच्या २१ व्या मजल्यावरुन तोल गेल्याने इशांत शिंदे या १५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

वसंत लॉन्स येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: माजीवडा भागातील वसंत लॉन्स येथील ‘सवाना’ या इमारतीच्या २१ व्या मजल्यावरुन तोल गेल्याने इशांत शिंदे या १५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. हा अपघाती मृत्यू असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.
दहावीत शिकणारा इशांत हा त्याच्या आईसोबत घरात होता. बेडरुमच्या खिडकीतून बाहेर डोकावतांना त्याचा अचानक तोल गेल्याने तो खाली कोसळला. घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन ढोले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने जवळच्याच ज्यूपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, डोक्याला मार लागल्याने मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याने आत्महत्या केली की, आणखी काही याही बाबी तपासण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.