धक्कादायक! ठाण्यात सेवानिवृत्त आरटीओ अधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 21:49 IST2020-09-25T21:42:56+5:302020-09-25T21:49:34+5:30
दारुच्या व्यसनाधीनतेमुळे आलेल्या नैराश्येमुळे ठाण्यात मोहमद सादिक शेख या प्रादेशिक परिवहन विभागातील सेवानिवृत्त अधिकाºयाने स्वत:वर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनास्थळावरुन रिव्हॉल्व्हर हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील कॅसलमिल भागात प्रादेशिक परिवहन विभागातील निवृत्त अधिकारी मोहंमद सादिक शेख (६८) यांनी स्वत:च्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्र वारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. दारूचे व्यसन असलेल्या शेख यांनी वैफल्यग्रस्त झाल्याने आत्महत्या केल्याची शक्यता राबोडी पोलिसांनी वर्तविली आहे.
कॅसलमिल येथील विकास कॉम्प्लेक्समध्ये राहणारे शेख हे त्यांच्या ४५ वर्षीय अभियंता मुलासोबत वास्तव्याला होते. शुक्र वारी दुपारी मुलगा घरात झोपलेला होता. त्याचवेळी त्यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा झोपेतून उठल्यानंतर त्याला हा प्रकार निदर्शनास आला. या घटनेची माहिती राबोडी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची नोंद राबोडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शेख यांची पत्नी त्यांच्यापासून गेल्या वर्षभरापासून वेगळी नेरळ येथे वास्तव्याला आहे. त्यांची एक मुलगी अभियंता तर दुसरी डॉक्टर आहे. दोन्ही मुली विवाहित असून अविवाहित अभियंता मुलगा त्यांच्यासमवेत होता. व्यसनाधीनतेतून आलेल्या नैराश्याने त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळावरुन पोलिसांनी त्यांची रिव्हॉल्व्हरही जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.