धक्कादायक! ठाण्याच्या नौपाड्यातून बेपत्ता झालेल्या दहावीच्या दोन विद्यार्थिनी मिळाल्या कर्जतमध्ये

By जितेंद्र कालेकर | Published: March 2, 2020 10:30 PM2020-03-02T22:30:12+5:302020-03-02T22:39:08+5:30

ठाण्याच्या नूरी बाबा दर्गा परिसरात राहणाऱ्या दहावीतील दोन मैत्रिणी अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी रविवारी नौपाडा पोलीस ठाण्यात दिली. याची गांभीर्याने दखल घेत अवघ्या २४ तासांमध्येच या दोन्ही मुलींना कर्जत येथून सुखरुपपणे ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

 Shocking! Karjat received two SSC student disappeared from Naupada in Thane | धक्कादायक! ठाण्याच्या नौपाड्यातून बेपत्ता झालेल्या दहावीच्या दोन विद्यार्थिनी मिळाल्या कर्जतमध्ये

२४ तासांमध्ये पोलिसांनी केला तपास

googlenewsNext
ठळक मुद्दे मित्रमैत्रिणींसोबत उत्स्फूर्तपणे गेल्याचे उघड२४ तासांमध्ये पोलिसांनी केला तपास

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नौपाड्यातील अनुराधा मंगल कार्यालय परिसरातून बेपत्ता झालेल्या १४ आणि १५ वर्षीय या दहावीला असलेल्या दोन विद्यार्थिनींचा अवघ्या २४ तासांमध्ये शोध घेण्यात नौपाडा पोलिसांना यश आले आहे. या दोघींच्याही अपहरणाचा गुन्हा रविवारी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
नूरीबाबा दर्गा रोड, अनुराधा मंगल कार्यालयाजवळ राहणारी प्रिया सोनवणे (१४) आणि वैशाली मगर (१५, दोघींच्याही नावात बदल आहे) या दोन्ही मुली १ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्या कुठे गेल्या, याची त्यांनी कुटुंबीयांनाही काहीच माहिती दिली नव्हती. बराच शोध घेऊनही रविवारी रात्री उशिरापर्यंत त्या घरी न परतल्यामुळे त्यांच्या पालकांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला होता. नौपाडा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी गांभीर्याने दखल घेऊन त्यांना शोधण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि उपनिरीक्षक विनोद लबडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या मित्रांची माहिती काढून त्यांना २ मार्च रोजी कर्जत (जि. रायगड) येथून ताब्यात घेतले. आपण स्वत:हून कर्जतला फिरण्यासाठी गेल्याचे प्रिया आणि वैशाली या दोन्ही मैत्रिणींनी सांगितले. या दोघीही दहावीमध्ये असून मंगळवारपासून शालान्त परीक्षा सुरू होणार आहे.
*महिनाभरात पाच मुली बेपत्ता
गेल्या महिनाभरात ठाण्यातील चार ते पाच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर या दोघींचेही कुटुंबीय तणावात होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेतल्याने या दोघींच्या पालकांनी नौपाडा पोलिसांचे आभार मानले आहेत.

Web Title:  Shocking! Karjat received two SSC student disappeared from Naupada in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.