मीरा-भाईंदर मेट्रोसाठी शिवसेनेची काळी दिवाळी; शाखांवर लावले काळे कंदिल लावून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 17:26 IST2018-11-11T17:26:25+5:302018-11-11T17:26:59+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा-भाईंदरकरांना मेट्रो देण्याची जाहीर घोषणा केल्यानंतर त्या केवळ वल्गनाच ठरल्याने शिवसेनेने शहरांतील शाखांवर काळे कंदील लावून काळी दिवाळी साजरी करीत मुख्यमंत्र्यांचा निषेध केला.

मीरा-भाईंदर मेट्रोसाठी शिवसेनेची काळी दिवाळी; शाखांवर लावले काळे कंदिल लावून निषेध
भार्इंदर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा-भाईंदरकरांना मेट्रो देण्याची जाहीर घोषणा केल्यानंतर त्या केवळ वल्गनाच ठरल्याने त्यांच्या या गाजर दाखविण्याच्या कारभाराचा निषेध करीत शिवसेनेने उशिरा का होईना शहरांतील शाखांवर काळे कंदील लावून काळी दिवाळी साजरी करीत मुख्यमंत्र्यांचा निषेध केला.
मीरा-भाईंदर मेट्रोसाठी राज्य सरकार आणि एमएमआरडीएकडून अनेकवेळा घोषणाबाजी करण्यात आली. शहरात मेट्रो येणार म्हणून मीरा-भाईंदरकरांना आनंद झाल्याने त्यांनी पालिकेत भाजपाला एकहाती सत्ता दिली. परंतु, मेट्रोच्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नसल्याने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मेट्रोचे काम तात्काळ सुरू झाले पाहिजे, अशी मागणी गतवेळच्या विधीमंडळ अधिवेशनात केली. त्याच्या निषेधार्थ त्यांनी सेनेच्या माध्यमातून सांकृतिक आंदोलने छेडण्याचे जाहिर केले. त्यानुसार गेल्या गोपाळकाल्याच्या दिवशी युवासेनेने संपूर्ण शहरात एमएमआरडीएचा निषेध करणारी काळे टि-शर्ट परिधान करुन हंडी फोडली. यानंतरच्या गणेशोत्सवात शिवसैनिकांनी भर रस्त्यात महाआरती करून एमएमआरडीएच्या नावे शंख केला होता. तद्नंतर नवरात्रौत्सवात शिवसेनेच्या महिला आघडीने भाईंदर पूर्वेकडील नवघर नाका आणि दीपक हॉस्पिटल सिग्नल येथे भर रस्त्यात गरबा नृत्य करून राज्य सरकारचा जाहिर निषेध केला. तसेच मुख्यमंत्र्यांना सुबूद्धी देण्याचे साकडे देवीला घातले. यानंतरही मेट्रोच्या कामाला सुरुवात न झाल्याने संतप्त शिवसेनेने शहरातील शाखांवर काळे कंदील लावून मुख्यमंत्री व एमएमआरडीएचा निषेध करीत काळी दिवाळी साजरी केली.