शिवसेनेच्या स्थानिक नेत्याचा भावाकडून खून; कारच्या डिकीत सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 10:13 IST2025-02-01T10:12:34+5:302025-02-01T10:13:01+5:30
दगडखाणीत ४५ फूट खोल पाण्यात कारच्या डिकीत अशोक यांचा मृतदेह सापडला.

शिवसेनेच्या स्थानिक नेत्याचा भावाकडून खून; कारच्या डिकीत सापडला मृतदेह
बोर्डी : तलासरी तालुक्यातील वेवजी गावचे बेपत्ता हॉटेल व्यावसायिक आणि शिंदेसेनेचे स्थानिक नेते अशोक रमण धोडी (वय ५२, रा. वेवजी, काटीलपाडा) यांचा मृतदेह शोधण्यात पालघर पोलिसांना शुक्रवारी यश आले. गुजरातमधील भिलाडच्या सरीगामच्या मालाफलिया येथील दगडखाणीत ४५ फूट खोल पाण्यात कारच्या डिकीत अशोक यांचा मृतदेह सापडला. त्यांचा सख्खा छोटा भाऊ अविनाश याने साथीदारांसह हा गुन्हा केला असून, तो फरार आहे.
गुन्ह्यातील चार संशयित अटकेत असून, आणखी दोघे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. गुन्ह्यातील चौघांना पोलिसांनी अटक केली. परंतु, मुख्य आरोपी पसार झाला आहे. उर्वरित आरोपींना ६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. चौकशीत अविनाश धोडी आणि अन्य साथीदारांनी अशोक यांचा खून करून मृतदेह गुजरातमधील सरीगाम येथील निर्जनस्थळी दगडखाणीत पाण्यात फेकल्याची कबुली दिली.
२० जानेवारीपासून बेपत्ता
शुक्रवारी पालघर पोलिस आणि गुजरात पोलिसांनी घटनास्थळी शोधमोहीम राबवली. दोरीला लोहचुंबक बांधून ४५ फूट खोल पाण्यात फिरवल्यावर कार आतमध्ये असल्याचे समजले. दोन हायड्रा आणि दोन गोताखोरांच्या मदतीने कार बाहेर काढली. डिकीत मृतदेह आढळल्याचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
कौटुंबिक वादासह अन्य कारणांतून हा खून झाला असून, मुख्य आरोपीच्या अटकेनंतर गुन्ह्याचा खुलासा होईल, असे पाटील यांनी सांगितले. २० जानेवारीपासून अशोक बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी घोलवड पोलिसात दिली होती.