शिवसेना-भाजपा पुन्हा श्रेयावरून आमनेसामने, विकासकामात अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:54 IST2017-10-03T00:54:19+5:302017-10-03T00:54:36+5:30
पालिका निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच चार नगरसेवकांच्या प्रभागात कामाच्या श्रेयावरुन राजकारण तापू लागले आहे.

शिवसेना-भाजपा पुन्हा श्रेयावरून आमनेसामने, विकासकामात अडथळा
मीरा रोड : पालिका निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच चार नगरसेवकांच्या प्रभागात कामाच्या श्रेयावरुन राजकारण तापू लागले आहे. मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये नवी जलवाहिनी टाकण्याचे काम प्रभागातील सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी बंद पाडल्याने शिवसेनेच्या नगरसेविकांनी धरणे धरले आहे. श्रेय लाटण्यावरुन शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांत जुंपली असून यामुळे भाजपा व शिवसेनेत तणातणी वाढण्याची शक्यता आहे.
शांतीनगरमधील सेक्टर दोनमध्ये बांधकाम सुरु असलेल्या जलकुंभातून सेक्टर १, २, शांती विहार व पूनम सागर कॉम्प्लेक्स भागातील नागरिकांची पाण्याची चणचण दूर करण्यासाठी ४०० मिमी व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम मंजूर झाले आहे. त्याचे कंत्राटही देण्यात आले आहे.
वास्तविक हे काम मागील पालिका कार्यकाळातील आहे. त्याला गेल्या आठवड्यात सुरवात झाली असून खोदकाम करुन मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. या कामासाठी मी सातत्याने पत्रव्यव्हार केला होता आणि काम मंजूर होऊन त्याची सुरवात झाली, असा दावा सेनेच्या नगरसेविका दिप्ती भट यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला.
प्रभाग २० मध्ये भट या एकमेव शिवसेनेच्या, तर भाजपाचे अश्विन कासोदरिया, दिनेश जैन व हेतल परमार असे तीन नगरसेवक आहेत. पालिकेने सोमवारी स्वच्छता अभियान आयोजित केले होते. त्या दरम्यान ही जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु असल्याचे भाजपा नगरसेवकांच्या लक्षात आले. आम्हीही या प्रभागातील नगरसेवक असल्याने प्रशासनाने कामाबद्दल तसेच ते सुरु करण्याबाबत माहिती द्यायला हवी होती. महापौर डिम्पल मेहता यांच्या हस्ते त्याचे भूमीपुजन करुन कामाची सुरवात करायला हवी होती, अशी भूमिका भाजपाच्या कासोदरीया, जैन व परमार या स्थानिक नगरसेवकांनी घेतली.
या वादात काम बंद पडले. ठेकेदाराने काम बंद केल्याने शिवसेना नगरसेविका दिप्ती भट यांनी भाजपाच्या या तिन्ही नगरसेवकांविरोधात थेट आयुक्तांसह सेना आ. प्रताप सरनाईक आदींकडे तक्रार केली आहे. भाजपा नगरसेवकांनी जलवाहिनीचे काम बंद पाडून नागरिकांना पुरेसे पाणी मिळू नये म्हणून विकासकामात अडथळा आणल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपा नगरसेवकांच्या श्रेयवादाच्या राजकारणामुळे जनहिताची कामे बंद पाडणे ही मनमानी असून पालिका प्रशासन अशा चुकीच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन देते, हे निषेधार्ह आहे. जोपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु होणार नाही तोपर्यंत धरणे सुरुच ठेवणार असल्याचे भट म्हणाल्या.