उल्हासनगर महापालिकेत शिंदेसेनेची 'मॅजिक फिगर' पूर्ण; अरुण आशान यांची गटनेतेपदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:06 IST2026-01-21T18:05:34+5:302026-01-21T18:06:25+5:30
उल्हासनगर महापालिकेत सत्तेसाठी ४० या जादूई आकड्याची गरज होती. निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते.

उल्हासनगर महापालिकेत शिंदेसेनेची 'मॅजिक फिगर' पूर्ण; अरुण आशान यांची गटनेतेपदी निवड
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेत लागलेल्या चढाओढीमध्ये अखेर शिंदेसेनेने बाजी मारली आहे. कोकण भवन येथे झालेल्या अधिकृत नोंदणीत शिंदेसेनेने ४० नगरसेवकांचे संख्याबळ दाखवून बहुमताचा आकडा पार केला. शिंदेसेनेच्या गटनेतेपदी अरुण आशान यांची नियुक्ती झाली असून यामुळे शिंदेसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उल्हासनगर महापालिकेत सत्तेसाठी ४० या जादूई आकड्याची गरज होती. निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. महापालिकेत भाजप-३७, शिंदेसेना-३६, वंचित बहुजन, आघाडी- ०२, साई पक्ष-०१, काँग्रेस-०१, अपक्ष -०१ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपकडे ३७ नगरसेवक असल्याने ते सत्तेच्या जवळ होते, मात्र शिंदेसेनेने अत्यंत प्रभावीपणे इतर छोट्या पक्षांना आणि अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले.
शिंदेसेनेचे- ३६, वंचित बहुजन आघाडीचे २, साई पक्षाचा १ आणि १ अपक्ष यांनी शिंदेसेनेला पाठिंबा दिला. या युतीमुळे शिंदेसेनेचे एकूण संख्याबळ ४० वर पोहोचले आहे. कोकण भवन येथे या ४० नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी शिंदेसेना म्हणून करण्यात आली. अशी माहिती नवनिर्वचित गटनेते अरुण अशांन यांनी दिली.
अरुण आशान गटनेते पदी
या सर्व घडामोडींनंतर अरुण आशान यांची शिंदेसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. महापालिकेत पक्षाची ध्येयधोरणे राबवणे आणि ४० नगरसेवकांच्या गटाचे नेतृत्व करण्याची महत्त्वाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर असेल.
महापौर पदाचा मार्ग मोकळा
भाजप ३७ जागांवर अडकल्याने आणि शिंदेसेनेने बहुमताचा ४० चा आकडा गाठल्याने आता उल्हासनगरच्या महापौरपदावर शिंदेसेनेचा दावा भक्कम झाला. यामुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागण्याची शक्यता असून शहरात आता शिंदेसेनेची सत्ता येण्याचे संकेत मिळत आहेत.