शिंदेसेनेचा सत्तेसाठी भाजपचा कित्ता; ओमी टीम व साई पक्षाला सोबत घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:45 IST2025-12-17T11:43:15+5:302025-12-17T11:45:06+5:30
युती न झाल्यास शिंदेसेना, भाजप, महाविकास आघाडीत लढत; भाजप व शिंदेसेना युती झाल्यास भाजपला शिंदेसेनेसह ओमी व साई पक्षाला जागा सोडाव्या लागणार

शिंदेसेनेचा सत्तेसाठी भाजपचा कित्ता; ओमी टीम व साई पक्षाला सोबत घेतले
सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर पालिकेवर भाजपने २०१७ मध्ये सत्ता मिळविण्यासाठी नैसर्गिक मित्र शिवसेनेला बाजूला सारून ओमी टीम व साई पक्षासोबत हात मिळवणी केली होती. भाजपचा तोच कित्ता शिंदेसेनेने यावेळी गिरवित ओमी टीम व साई पक्षाला सोबत घेऊन भाजपला कोंडीत पकडले. भाजप व शिंदेसेनेची युती न झाल्यास शिंदेसेना व मित्रपक्ष, भाजप व महाविकास आघाडी यांच्यात लढत होईल.
भाजप व शिंदेसेनेची युती झाली तर भाजपला शिंदेसेनेसह ओमी टीम व साई पक्षाला जागा सोडाव्या लागतील. मराठी पट्टधात शिवसेनेचे तर सिंधी पट्टयात ओमी टीम, साई पक्ष व भाजपचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत भाजप व ओमी टीमचे ३३ नगरसेवक निवडून आले होते. ३३ पैकी ओमी टीमचे १६ नगरसेवक होते, तर शिवसेनेचे २५ नगरसेवक निवडून आले. म्हणजे भाजपची ताकद २० नगरसेवकांपेक्षा जास्त नाही. महाविकास आघाडीतील उद्धवसेना, मनसे व काँग्रेसचा काही प्रभागात दबदबा आहे. युती झाल्यास मराठी पट्टयात शिंदेसेना व महाविकास आघाडी अशी लढत होईल.
एकूण प्रभाग किती आहेत ? - २०
एकूण सदस्य संख्या किती? - ७८
कोणते मुद्दे निर्णायक?
१. शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडलेला आहे. बेकायदा बांधकामे नियमित करणे.
२. वास्तविक शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असला तरी अनेक भागांत पाणीटंचाई असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
३. डम्पिंग ग्राउंडचे स्थलांतर, शहरातील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण रखडले आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीतही वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
महापालिकेत कुणाची होती सत्ता?
भाजप-ओमी टीम - ३३
शिवसेना - २५
काँग्रेस - १
साई पक्ष - ११
राष्ट्रवादी काँग्रेस - ४
आरपीआय - २
भारिप व पीआरपी - २
मागील निवडणुकीत एकूण मतदार किती?
एकूण - ४,०६, ८७४
पुरुष - २,२२,६५२
महिला - १,८४,१८५
इतर - १७
आता एकूण किती मतदार ?
एकूण - ४,३९,९१२
पुरुष - २,३२,७३६
महिला - २,०७,०२२
इतर - १५४
वाढलेल्या मतदारसंख्येचा लाभ
कुणाला होणार? : मतदारांच्या संख्येत आठ टक्के वाढ झाली असून, भाजप, शिंदेसेनेला लाभ होईल. वंचितलाही काही प्रमाणात फायदा होऊ शकेल.