लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर : बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदारयादीत शहराबाहेरील १७ हजार मतदारांची नावे आहेत, असा दावा शिंदेसेनेकडून करण्यात आला आहे. हे मतदार मतदान करायला आले, तर त्यांना चोप देऊ, असा इशाराही शिंदेसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला आहे.
बदलापूरमध्ये दुबार मतदारांची संख्या मोठी आहे, तर बदलापूर शहरालगतच्या ग्रामीण भागातील तब्बल १७ हजार मतदारांची नावे बदलापूर शहराच्या मतदारयादीत टाकण्यात आली आहेत, असा आरोप म्हात्रे यांनी केला.
...तर जबाबदारी निवडणूक आयोगाची : वामन म्हात्रे
मलंगगड, बारवी परिसर, मुरबाड, शेलू, नेरळ, वांगणी, भिवंडी, शहापूर, कर्जत आणि आसपासच्या ग्रामीण भागातल्या मतदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहितीही म्हात्रे यांनी दिली. मतदानाच्या दिवशी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल, असेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शिंदेसेनेने केलेला दावा तपासण्याची वेळही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आली आहे.