अंबरनाथमध्ये शिंदे सेना आणि भाजपामध्ये जुंपली; मित्र पक्षातच नगरसेवकांची फोडाफोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 15:30 IST2025-10-22T15:30:12+5:302025-10-22T15:30:46+5:30
निवडणुका समोर येताच आता अंबरनाथमध्ये भाजपा आणि शिंदे सेना यांच्यातच राजकारण तापलं आहे.

अंबरनाथमध्ये शिंदे सेना आणि भाजपामध्ये जुंपली; मित्र पक्षातच नगरसेवकांची फोडाफोडी
अंबरनाथ - निवडणुका समोर येताच आता अंबरनाथमध्येभाजपा आणि शिंदे सेना यांच्यातच राजकारण तापलं आहे. एकमेकांच्या नगरसेवकांना फोडण्याचे काम दोन्ही पक्षांमार्फत सुरू आहे. सुरुवातीला भाजपाने आणि आता शिंदे सेनेने एकमेकांचे नगरसेवक आपल्या पक्षात घेतले आहेत. त्यामुळे विरोधकांना घाम फोडणे ऐवजी मित्रपक्षच एकमेकांना घाम फोडत असल्याचे चित्र अंबरनाथमध्ये निर्माण झाले आहे.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे सेना आणि भाजपा यांना आगामी पालिका निवडणुकीत एकमेकांसोबत युती करण्यात कोणताही रस नसल्याचं दिसून येत आहे. युती होणार नसल्यामुळे आता भाजपा आणि शिंदेसेना एकमेकांच्या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा लावत आहेत. शिंदे सेनेचे नगरसेवक सुरेंद्र यादव यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला. या घटनेला दोन आठवडे उलटत नाही तो आता शिंदे सेनेने देखील भाजपाच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
शिंदे सेनेचे पदाधिकारी फोडले
शिंदे सेनेचे पदाधिकारी असलेले दुर्गेश चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश करून घेण्यात आला. भाजपाची ही नीती देखील चांगलीच जिव्हारी लागली होती.
भाजपाने सलग दोन वेळा शिंदे सेनेच्या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना पक्ष प्रवेश दिल्यानंतर आता शिंदे सेनेने देखील भाजपच्या नगरसेविका दीपा गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला.
आणखीन नगरसेवक शिंदे सेनेच्या वाटेवर
भाजपाचे आणखीन काही नगरसेवक आणि पदाधिकारी हे शिंदे सेनेच्या वाटेवर असून त्यांचा देखील लवकरच पक्षप्रवेश होणार आहे मात्र हे नगरसेवक आणि पदाधिकारी नेमके कोण हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
राष्ट्रवादीचा नगरसेवक शिंदेसेनेत
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक उमर इंजिनिअर यांनी देखील शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.