Shed on the dangerous building of Ambernath Mills | अंबरनाथमधील महावितरणच्या धोकादायक इमारतीवर शेड
अंबरनाथमधील महावितरणच्या धोकादायक इमारतीवर शेड

अंबरनाथ : येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयाची इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीच्या स्लॅबमधील सर्व लोखंड गंजले असून अनेक ठिकाणी स्लॅब कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळती होते. या इमारतीची अवस्था पाहता दुरुस्तीची गरज आहे. मात्र, महावितरणने दुरुस्ती न करता त्या इमारतीवर थेट लोखंडी खांब टाकून त्यावर पत्रे टाकण्याचे काम सुरू केले आहे. आधीच धोकादायक झालेल्या या इमारतीवर लोखंडाचे वजन पडल्याने हा धोका वाढणार आहे. या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी केली जात आहे.

कल्याण-बदलापूर रस्त्यावरील महावितरण विभागाचे वीजबिल भरणा केंद्र आणि त्यात असलेले कार्यालय हे सध्या धोक्यात आहे. ज्या इमारतीत हे कार्यालय आहे, ती इमारत अनेक ठिकाणी खचण्याच्या मार्गावर आहे. या इमारतीच्या स्लॅबला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. अनेक ठिकाणी स्लॅबमधील खांबांचे गंजलेले लोखंडही दिसत आहे. काही ठिकाणी तर स्लॅब निखळून पडला आहे. असे असतानाही त्या इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. इमारत धोकादायक असतानाही त्यात कर्मचारी काम करत आहेत. तर, दुसरीकडे या धोकादायक अवस्थेतील इमारतीत वीजबिल भरले जात असल्याने ग्राहकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे नगरसेवक उमेश पाटील यांनी इमारतीची पाहणी केली असता दुरुस्तीची मागणी केली आहे. इमारत धोकादायक असतानाही या इमारतीवर लोखंडी रॉड टाकून छत टाकण्याचे काम सुरू केले आहे. आधीच इमारतीमधील स्लीट गंजलेले असताना त्यावर अतिरिक्त भार टाकण्यात येत आहे. त्यामुळे ही इमारत खचण्याचा धोका वाढला आहे. यासंदर्भात पाटील यांनी महावितरण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातही संपर्क साधून छताचे काम न करता आधी इमारतीच्या दुरुस्तीचे काम करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात महावितरणचे अधिकारीही बोलण्यास तयार नाही. ज्या इमारतीच्या आवारात अधिकारी बसतात, त्याच इमारतीच्या धोकादायक स्थितीबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखवण्यापलीकडे ते काहीच करू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. या इमारतीच्या धोकादायक स्थितीबाबत कर्मचारी उघडपणे बोलत आहे. मात्र, वरिष्ठ कार्यालय त्याकडे दुर्लक्ष करते, अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. इमारतीला पावसात गळती लागत असल्याने इमारतीवर छत टाकले जात आहे. प्रत्यक्षात इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासंदर्भात अंबरनाथ कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी वरिष्ठ कार्यालय यासंदर्भात निर्णय घेईल, एवढेच उत्तर त्यांनी यावेळी दिले.

मनसेचे आंदोलन
अंबरनाथमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. या खंडित वीजपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. हा प्रकार नियमित घडत असताना महावितरण विभागाचे अधिकारी नागरिकांना सहकार्य करत नाहीत. या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांच्या तक्रारीवरून मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर, संदीप लकडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. अधिकाºयांना कंदील भेट देत नागरिकांच्या त्रासाची कल्पना दिली.

वीजबिल भरणा केंद्रातील इमारत धोकादायक स्थितीत आहे. त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट करून इमारतीच्या स्थितीचे अवलोकन केले पाहिजे. तसेच त्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम करून त्यावर छत टाकणे गरजेचे आहे. मात्र, तसे न करताच थेट छत टाकणे म्हणजे इमारतीला धोका निर्माण होईल.
- उमेश पाटील, नगरसेवक


Web Title: Shed on the dangerous building of Ambernath Mills
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.