लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाची नागरिकांनी काढली धिंड; बेदम चोपही दिला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 11:28 IST2024-08-29T11:28:27+5:302024-08-29T11:28:44+5:30

विरार पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Sexual harassment teacher punished | लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाची नागरिकांनी काढली धिंड; बेदम चोपही दिला!

लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाची नागरिकांनी काढली धिंड; बेदम चोपही दिला!

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : खाजगी क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाला बेदम चोप देऊन नागरिकांनी त्यांची धिंड काढल्याची घटना बुधवारी सकाळी विरारच्या मनवेल पाडा परिसरात घडली आहे. विरार पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मनवेल पाड्याच्या सह्याद्रीनगरमध्ये आरोपी शिक्षक हा खाजगी ट्यूशन क्लास चालवतो. यामध्ये त्याने ७ वी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मागील आठवड्यात लैंगिक छळ केल्याने ती घाबरून २ दिवस ट्यूशनला गेली नाही. तिला घरच्यांनी ट्यूशनला का जात नाही, हे विचारल्यावर तिने हा धक्कादायक प्रकार सांगितला. यानंतर बुधवारी सकाळी मुलीचे पालक आणि परिसरातील संतप्त नागरिक ट्यूशनमध्ये गेले व आरोपी शिक्षकाला मारहाण करून भर रस्त्यावरून त्याची धिंड काढली. या मारहाणीत आरोपी शिक्षक हा रक्तबंबाळ झाला होता.

या शिक्षकाने ३ ते ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. ज्या मुलींचा या आरोपी शिक्षकाने लैंगिक छळ केला आहे त्या मुली घाबरतात. याची पोलिसांनी चौकशी करून आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिक महिलेने केली आहे.

नागरिकांनी आरोपी शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याने मुलीची छेड काढून लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. तिचा जबाब नोंदवत असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
- विजय पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विरार पोलिस ठाणे

Web Title: Sexual harassment teacher punished