मुंबईसह ठाणे, पुणे येथील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 12:33 IST2025-07-20T12:33:25+5:302025-07-20T12:33:53+5:30

दोन सहायक पोलिस आयुक्तांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार या महिलेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस महासंचालक यांच्याकडेही केली.

Sexual harassment allegations against many senior officials in Mumbai, Thane, and Pune! | मुंबईसह ठाणे, पुणे येथील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप!

मुंबईसह ठाणे, पुणे येथील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप!

ठाणे : जीएसटीचे सहायक आयुक्त, दोन सहायक पोलिस आयुक्त, भिवंडीचे माजी पोलिस उपायुक्त, दोन पोलिस निरीक्षक, दोन उत्पादन शुल्क अधिकारी, एक सहायक पोलिस निरीक्षक अशा बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार ठाण्यातील बडतर्फ होमगार्ड महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अलीकडेच केली. यापैकी दोन सहायक पोलिस आयुक्तांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार या महिलेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस महासंचालक यांच्याकडेही केली. या महिलेकडे काही अधिकाऱ्यांची अश्लील छायाचित्रे व फोनवरील संभाषण असल्याचा दावा ही महिला करीत आहे.

मात्र, ही महिला अशा प्रकारे तक्रारी करून ब्लॅकमेल करीत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या वकिलांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सहायक पोलिस आयुक्त प्रिया ढमाले यांनी चौकशी करून आपला अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. ठाण्यातील या प्रकरणाचा नाशिकमधील हनी ट्रॅपच्या प्रकरणाशी सूतराम संबंध नसल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले.

फिर्यादी महिलेच्या दाव्यानुसार, दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजी ठाण्यातील कळवा येथील एका फ्लॅटमध्ये सहायक पोलिस आयुक्तांनी या महिलेला बोलावून घेतले. त्यांनी आपल्याला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. यावेळी तेथे नवी मुंबईतील तत्कालीन सहायक आयुक्त हजर होते. दोघांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केला. संबंधित सहायक आयुक्तांनी असा दावा केला की, बलात्कारासारखा गंभीर प्रकार घडल्यानंतर दीर्घकाळानंतर सदर महिलेने तक्रार करणे हेच संशयास्पद आहे. त्याचबरोबर या महिलेच्या विरोधात आपणही कळवा पोलिस ठाण्यात खंडणीची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात महिलेस अंतरिम जामीन दिला आहे.

अधिकाऱ्यांना क्लीन चीट?
ठाणे पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर महिलेच्या सहायक आयुक्तांविरुद्धच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे नमूद केले असल्याचे समजते. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. पोलिस आपल्या तक्रारीवरून सहायक आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करीत नसल्याबद्दल महिलेने पत्रकारांकडे नाराजी व्यक्त केली. याबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने अहवालाबाबत भाष्य करण्यास ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी नकार दिला.


काही तक्रारी घेतल्या मागे
बलात्कार आणि विनयभंगाच्या दोन प्रकरणांत या महिलेने तक्रार मागे घेतल्याने सी समरी न्यायालयात पोलिसांनी दाखल केली. कळव्यातील प्रकरणात पोलिस चौकशी सुरू आहे. पोलिस उपायुक्तांविरुद्धच्या प्रकरणात गैरसमजुतीमधून तक्रार अर्ज केल्याचा दावा महिलेनेच केला. मुंबईतील जीएसटीच्या सहायक आयुक्तांविरुद्धचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यासंबंधीची तक्रार मागे घेतली. दोन पोलिस निरीक्षक आणि एक सहायक निरीक्षक यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीत पाठपुरावा करण्यात रस नसल्याचे महिलेने म्हटले आहे.

महिलेवर खंडणीचे गुन्हे
तक्रारदार महिलेविरुद्ध मुंब्रा व भोसरी पोलिस ठाण्यामध्ये २०१६ व २०२२ मध्ये खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच, बदनामी केल्याबद्दल कळवा व मुंब्रा पोलिस ठाण्यात २०२२ व २०२३ मध्ये गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांची चुप्पी
ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे व सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांना यासंदर्भात सातत्याने फोन केले. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Sexual harassment allegations against many senior officials in Mumbai, Thane, and Pune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.