ठाण्यात वाहने जाळण्याचे सत्र सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 23:22 IST2019-02-15T23:16:19+5:302019-02-15T23:22:10+5:30
ठाणे शहरातील वाहनांना आगी लागण्याचे प्रकार अद्याप सुरुच आहेत. शुक्रवारी पहाटे देखिल लोकमान्यनगर येथील दोन मोटारसायकलींना आगी लागल्या. ही आग लागली की, लावण्यात आली, याचा तपास करण्यात येत असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.

वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे: शहरात वाहनांना लागी लागण्याचे सत्र सुरुच असून लोकमान्य नगर पाडा क्रमांक चार येथील दत्तकृपा चाळीजवळ प्रकाश अकोलकर आणि दीपक गुप्ता यांच्या मोटारसायकलींना आगी लावल्याची घटना शुक्र वारी पहाटे ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमान्य नगर पाडा क्र मांक चार मध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या अकोलकर आणि गुप्ता यांच्या दुचाकींनी अचानक पेट घेतला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणण्यात आली. जळालेल्या दुचाकीपैकी एका दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही आगी लागली की लावण्यात आली, याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या वर्षभरात वागळे इस्टेट, कासारवडवली, कोपरी, नौपाडा अशा विविध भागांमध्ये मोटारसायकल तसेच वाहनांना आगी लावण्याच्या दहा ते १२ घटना घडल्या आहेत. त्यात शुक्रवारी पुन्हा आणखी एक घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.