ठाण्यातील मासुंदा तलावात वृद्धाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 17:24 IST2018-10-03T17:19:56+5:302018-10-03T17:24:45+5:30
अवघ्या २४ तासांतच ठाण्याच्या मासुंदा तलावामध्ये आणखी एकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वा. च्या सुमारास घडली. संबंधित मृतदेहाची ओळख पटविण्यात येत असून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.

मासुंदा तलावातील २४ तासात दुसरी घटना
ठाणे: मासुंदा तलावात उडी घेऊन ६५ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. आत्महत्या करणाऱ्याचे नाव आणि कारणही समजू शकले नसल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
याच तलावाच्या परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन सनी सोनकुळे (२५) या फिरस्त्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वा. च्या सुमारास घडली होती. या घटनेला २४ तास पूर्ण होण्यापूर्वीच या तलावात उडी घेत या अनोळखीने आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना घडली. एकाच आठवडयामध्ये शहरातील ही तिसरी घटना आहे. गेल्या आठवडयामध्ये उपवन तलावापासून जवळच असलेल्या एका झाडाला सुरक्षा रक्षकाने पत्नीशी झालेल्या वादातून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तलाव परिसरात एका पाठोपाठ होत असलेल्या या आत्महत्यांच्या सत्रामुळे आश्चर्च व्यक्त होत आहे. दरम्यान, बुधवारी मासुंदा तलावात उडी घेऊन आत्महत्या केलेल्या या वृद्धाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले. बुधवारी सकाळी ६ वा. च्या सुमारास या तलावात एक अनोळखी व्यक्ती पडल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे अग्निशमन दलाच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याची ओळख पटविण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.